कोरोना प्रतिबंधक लशीने मुलीचा मृत्यू! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना प्रतिबंधक लशीने मुलीचा मृत्यू!
कोरोना प्रतिबंधक लशीने मुलीचा मृत्यू!

कोरोना प्रतिबंधक लशीने मुलीचा मृत्यू!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : कोरोना लशीचे दुष्परिणाम होऊन मुलीच्या मृत्यूचा दावा करत वडिलांनी एक हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने सीरम इन्स्टिट्यूटसह अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स, केंद्र आणि राज्य सरकारलाही नोटीस बजावली आहे. तसेच याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिलीप लुनावत यांनी ही याचिका केली आहे. केंद्र व राज्य सरकार यांनी लस सुरक्षित असल्याचे वारंवार सांगितले; मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप लुनावत यांनी याचिकेतून केला आहे. याचबरोबर गुगल, यू-ट्युब, मेटा यासारखी समाजमाध्यमे लशीच्या दुष्परिणामांमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत योग्य आणि सत्य माहिती दडपण्याच्या कटात सहभागी असल्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.

याचिकेवर नुकताच न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी करत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?
याचिकाकर्त्यांची मुलगी स्नेहल लुनावत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (जि. नाशिक) येथील धामणगावच्या दंत महाविद्यालयात वरिष्ठ प्राध्यापक आणि डॉक्टर म्हणून कार्यरत होती. आरोग्य सेविका असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेणे त्यांना क्रमप्राप्त होते. स्नेहल यांनी २८ जानेवारी २०२१ ला कोविशिल्ड लशीची मात्रा घेतली; परंतु १ मार्च २०२१ ला त्यांचा मृत्यू झाला. हा मृत्यू अयोग्य लशीमुळे झाल्याचा दावा वडील दिलीप लुनावत यांनी केला आहे.

...हे आहेत दावे
१) ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एआयआयएमएस) च्या संचालकांनी केलेल्या दाव्यांनुसार, कोरोना प्रतिबंधित लस सुरक्षित आणि हितकारक असल्याचे म्हटले होते; मात्र हा दावा फोल ठरला असून, चुकीच्या दाव्यांमुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचे लुनावत यांनी याचिकेत म्हटले आहे.

२) विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या एईएफआय या समितीने २ ऑक्टोबर २०२१ ला आपल्या मुलीचा कोविशिल्ड लशीच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाल्याचे एका अहवालात मान्य केले आहे, असा दावा केला आहे. त्यामुळे आपल्या मुलीला न्याय मिळावा आणि अन्य नागरिकांचेही प्राण वाचावेत म्हणून याचिका केल्याचे लुनावत यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08517 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..