Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवातील देखावा संदेश देणारा असावा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

court
गणेशोत्सवातील देखावा संदेश देणारा असावा!

Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवातील देखावा संदेश देणारा असावा!

मुंबई : नव्याने सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर चित्रमय टीका करणाऱ्या कल्याणमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुंबई उच्च न्यायालयाने अटींसह देखावा लावण्यास परवानगी दिली आहे. ठाकरे यांची छायाचित्रे लावल्यामुळे गुन्हा कसा होतो, असा प्रश्न करतानाच देखावा संदेश देणारा असावा, कोणाला अवमानित करणारा नसावा, असेही न्यायालयाने पोलिस आणि मंडळाला सुनावले आहे.

कल्याणमधील विजय तरुण मंडळाने शिवसेनेमधील बंडखोरीवर यंदाचा देखावा तयार केला आहे. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवानेते आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे वापरली आहेत. त्याचबरोबर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह धर्मवीर आनंद दिघे यांचे छायाचित्र आहे. देखाव्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्याशी साधर्म्य असलेले एक छायाचित्र आहे. कल्याण पोलिसांनी या देखाव्यावर आक्षेप घेऊन संपूर्ण देखावाच पहाटेच्या सुमारास जप्त करत मंडळाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यामुळे मंडळाने आज न्यायालयात तातडीने याचिका दाखल केली.

सध्या न्यायालयाला गणपती उत्सवाची सुटी आहे. त्यामुळे न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी त्यांच्या दालनात सुनावणी घेतली. देखाव्यात उद्धव ठाकरे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे लावण्यास आक्षेप का आहे, यामुळे कोणता गुन्हा होतो, असे खंडपीठाने पोलिसांना खडसावले. तसेच गणेशोत्सवातील देखावे सामाजिक संदेश देण्यासाठी असतात. त्यातून कोणालाही अपमानित करू नये, अशी समज न्यायालयाने मंडळाला दिली. शहा यांच्यासारखे दिसणारे छायाचित्र लावू नये; मात्र अन्य छायाचित्रे लावण्यासाठी परवानगी आहे, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

काय आहे देखावा?
कल्याणमधील विजय तरुण मंडळाचे यंदाचे ५९ वे वर्ष आहे. ‘पक्षनिष्ठा’ अशी यंदाच्या देखाव्याची थीम असून शिवसेना एका भव्य वृक्षाच्या स्वरूपात दाखवली आहे. यामध्ये काही फांद्या मोडल्या आणि काही जण झाडाची फळे घेत आहेत; तरीही वृक्ष भरभक्कम आहे, अशा स्वरूपाचा देखावा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08525 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..