आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देणार

sakal_logo
By

मुंबई, ता. ५ : केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन शिक्षण धोरणाची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करायची आहे. यासाठी शिक्षकांनीही धोरणाचा लाभ विद्यार्थी-पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. तसेच राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितानाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व प्राथमिक स्तरांपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘वर्षा’ निवासस्थानी समिती सभागृहातून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण सचिव रणजितसिंग देओल, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे उपस्थित होते. राज्यातील जिल्हाधिकारी यांच्यासह शिक्षकही दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. नवीन शैक्षणिक धोरण आत्मनिर्भर भारतासाठी टाकलेले एक पाऊल आहे. पाचवीपर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेतून दिले जाणार आहे. पूर्व प्राथमिक शिक्षक आंतरराष्ट्रीय करण्याचे ठरविण्यात आले. शिक्षकांच्या योग्य मूल्यमापनाचा यात विचार करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील शिक्षकांच्या कार्याचा आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करताना शिक्षकांचे महत्त्वही त्यांनी विषद केले. पटसंख्या वाढविण्यासाठी योगदान दिलेल्या शिक्षकांचा मुख्यमंत्र्यांनी नाव पुकारून गौरव केला. तसेच आपणही महापालिकेच्या शाळेत शिकल्याची आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. गुगल हे माहिती देते; परंतु ज्ञान हे केवळ शिक्षकच देत असतो. त्यामुळे त्यांचे समाजातील स्थान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. कोरोनाचा काळ चिंताजनक होता. त्या काळात शिकवण्याच्या पद्धतीत बदल झाला. त्या काळातील शिक्षकांचे योगदान कधीही विसरले जाणार नसल्याचे शिंदे म्हणाले.

प्रलंबित मागण्यांवर आश्वासन
शिक्षकांचे वेतन त्यांच्या खात्यात वेळेवर जमा होईल यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना विभागाला देतानाच केंद्र प्रमुखांच्या रिक्त जागा लवकरच भरल्या जातील. त्याचबरोबर शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच आयोजित केला जाईल. राष्ट्रीय कर्तव्य आणि जबाबदारीचे काम सोडले तर इतर अशैक्षणिक कामांचा भार शिक्षकांवर पडणार नाही, याच्या सूचना विभागाला दिल्या जातील. शाळाबाह्य मुलांच्या विषयावर मार्ग काढला जाईल, तसेच शालेय पोषण आणि व्यक्तिगत लाभांच्या योजनांतील त्रुटींवर लक्ष दिले जाईल. यातूनच शिक्षण क्षेत्राचे बळकटीकरणाचे काम केले जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08578 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..