भाषा, अंक आकलनात राज्यातील विद्यार्थी आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाषा, अंक आकलनात राज्यातील विद्यार्थी आघाडीवर
भाषा, अंक आकलनात राज्यातील विद्यार्थी आघाडीवर

भाषा, अंक आकलनात राज्यातील विद्यार्थी आघाडीवर

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : राज्यातील विद्यार्थ्यांची आकलन आणि अध्ययन क्षमता चांगली असल्याचे केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेल्या पायाभूत अध्ययन अभ्यास (एफएलएस) सर्वेक्षणातून पुढे आले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांचे भाषा, अंक आकलन हे इतर राज्यांच्या तुलनेत समाधानकारक असल्याचे नमूद करण्यात आले.
केंद्र सरकारच्या शिक्षण विभागामार्फत एनसीआरटीने देशभरात केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील तब्बल ५७८ शाळांमधील ५ हजार ३०८ विद्यार्थ्यांची आकलन क्षमता तपासण्यात आली. त्यानुसार पायाभूत अध्ययन अभ्यासाच्या सर्वेक्षणात मराठी भाषा आकलनात महाराष्ट्राची कामगिरी ८३ टक्के, तर देशाची कामगिरी ८२ टक्के आहे. इंग्रजी भाषेत हे प्रमाण महाराष्ट्र ८८ टक्के, देश ८६ टक्के, तर हिंदी भाषेत राज्य ८८ टक्के, तर देशाची कामगिरी ८५ टक्के आहे. दुसरीकडे विद्यार्थ्यांची इंग्रजी, मराठी आणि इतर विषयातील वाचनक्षमता किंचित सुधारली असून अक्षरज्ञानामध्ये राज्यातील विद्यार्थी देशाच्या तुलनेत अधिक विकसित झाल्याचे नमूद केले आहे. बेरीज-वजाबाकी, भागाकार-गुणाकारातही राज्यातील विद्यार्थ्यांची प्रगती चांगली असल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे.
सर्वेक्षणादरम्यान विद्यार्थ्यांचे शब्द वाचन ऐकून शब्द लिहिण्याची क्षमता, चित्र ओळखणे, भाषेतील कृती तयार करून अंक ओळखणे आदी चाचण्या घेण्यात आल्या, तसेच त्यावरून विद्यार्थ्यांची आकलन आणि अध्ययन क्षमता निश्चित करण्यात आली. राज्यातील या सर्वेक्षणामध्ये मराठीसोबतच गुजराती, कन्नड, हिंदी, बांगला आणि उर्दू माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
--
सर्वेक्षणाचे उद्दिष्टे
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यामध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञानावर भर देण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून ‘निपुण भारत’ हे अभियान राबवले जात आहे. त्यासाठी सन २०२६-२७ पर्यंतच्या इयत्ता तिसरीपर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान तपासण्यासाठी तसेच त्यातील प्रगती साधण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.
--
विद्यार्थ्यांची अंकगणितातील प्रगती (टक्क्यांमध्ये)
विषय राज्य देश
अंकवाचन (९९९९ पर्यंत) ६० ६४
बेरीज ५५ ५३
वजाबाकी ६७ ६२
गुणाकार ७१ ७१
भागाकार ५८ ४९
मोजमाप करणे ६१ ६२
वेळ ओळखणे ५४ ५२
---
राज्यातील सहभागी शाळा आणि विद्यार्थी
माध्यम शाळांची संख्या विद्यार्थी शिक्षक
मराठी ११३ १०३३ १९७
इंग्रजी १४० १४१८ २७५
गुजराती ३४ २९१ ६७
हिंदी १०५ ९३८ २०५
उर्दू ११० १०३३ १९७
बंगाली ३८ ३१२ ६९
कन्नड ३८ ३२२ ६७
एकूण ५७८ ५३०८ १०९१

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08613 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..