विसर्जनासाठी महापालिका, पोलिस सज्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विसर्जनासाठी महापालिका, पोलिस सज्ज
विसर्जनासाठी महापालिका, पोलिस सज्ज

विसर्जनासाठी महापालिका, पोलिस सज्ज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : भाविकांकडून लाडक्या गणरायाची १० दिवस मनोभावे सेवा झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला निर्विघ्नपणे निरोप देण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. पालिकेने इतर सहाय्यभूत यंत्रणांच्या मदतीने विसर्जनाची पूर्वतयारी केली आहे; तर विसर्जनस्थळी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी मुंबई पोलिसांनीही राखीव तुकड्या तैनात केल्या आहेत.
मुंबईत १२ हजार लहान-मोठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत; तर दीड लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्ती विराजमान झाल्या आहेत. गिरगाव, जुहू, वेसावे, दादर, वरळी, आक्सा, मार्वे खाडी आदी ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि १६२ कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेश विसर्जनाची तयारी पालिकेतर्फे करण्यात आली आहे. तसेच, पालिकेने फिरत्या कृत्रिम तलावांचीही व्यवस्था केली आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी १८,५०० हून अधिक पोलिस कर्मचारी, अधिकारी तसेच इतर विशेष तुकड्या शुक्रवारी मुंबईत बंदोबस्तासाठी तैनात असतील. यामध्ये १५,५०० हून अधिक पोलिस कर्मचारी, ३,२०० पोलिस अधिकारी, ८ राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्या, एक रॅपिड ॲक्शन फोर्स, ७५० होमगार्ड आणि २५० प्रशिक्षणार्थी यांचा समावेश आहे. वाहतूक पोलिसांचाही मोठा बंदोबस्त असेल.

पाहुण्यांसाठी शामियाना
शहर विभागातील बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात येते. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी विविध मान्यवर, पाहुणे, राजदूत, निमंत्रित, विदेशी नागरिकही विसर्जन सोहळा पाहण्यासाठी येतात. त्याअनुषंगाने स्वागत व्यवस्था, विसर्जन मार्ग व विसर्जनासाठी समुद्रकिनारी केलेली व्यवस्था, पाहुण्यांसाठी शामियाना, निरनिराळे कक्ष, वाहनतळ, स्वच्छता, सुरक्षा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जन तयारीचा आढावा
गणेशमूर्तींचे विसर्जन लक्षात घेऊन अतिरिक्त पालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे यांनी गिरगाव चौपाटीसह वरळी, दादर, माहीम, शीव आदी ठिकाणी आज भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली. यासह त्यांनी जी/दक्षिण विभागात वरळीतील लोटस जेट्टी येथे पाहणी केली; तर जी/उत्तर विभागातील दादर चौपाटी व माहीम रेतीबंदर चौपाटी यासह एफ/उत्तर विभागातील शीव (सायन) तलाव या नैसर्गिक स्थळीदेखील थेट तराफ्यावर जाऊन आढावा घेतला.

रस्त्यावरील खड्डे बुजवले
यंदाचा श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले होते. त्याप्रमाणेच विसर्जन सोहळाही निर्विघ्न पार पडावा, यासाठी खड्डे भरण्याचे काम वेगात सुरू आहे. खड्डे बुजवण्यासाठी विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथक नेमण्यात आले असून त्यांच्याकडून रस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.

अवजड वाहनांना बंदी
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी उद्या (शुक्रवार) मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. यात भाजीपाला, दूध, ब्रेड, बेकरी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, पाण्याचे टँकर, पेट्रोल, डिझेल, रॉकेलचे टँकर, रुग्णवाहिका, सरकारी आणि निमसरकारी वाहने आणि स्कूल बसला सूट दिली आहे. विसर्जनाच्या निमित्ताने नागरिकांना रहदारीचे निर्बंध आणि वाहतूक व्यवस्थापनविषयी वाहतूक पोलिसांनी समाजमाध्यमावरून माहिती देत सहकार्याचे आवाहन केले आहे.

७४ रस्ते बंद; ५४ रस्त्यांवर एकेरी वाहतूक
मुंबईतील एकूण ७४ रस्ते विसर्जनाच्या दिवशी वाहतुकीसाठी बंद केले जातील; ५४ रस्त्यांवर फक्त एकेरी मार्गाने वाहतूक होईल, ५७ रस्त्यांवर अवजड वाहनांना बंदी; संपूर्ण शहरात ११४ ठिकाणी पार्किंग निर्बंध लागू असतील.

विसर्जनस्थळी सुविधा
- २४ प्रशासकीय विभागस्तरावर १८८ नियंत्रण कक्ष
- प्रमुख विसर्जनस्थळी तब्बल ७८६ जीव रक्षक तैनात
- नैसर्गिक विसर्जनस्थळी ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफा
- समन्वयासाठी प्रमुख विसर्जनस्थळी २११ स्वागत कक्ष
- प्रकाशव्यवस्थेसाठी ३,०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट
- वैद्यकीय सामुग्रीसह १८८ प्रथमोपचार केंद्रे व ८३ रुग्णवाहिका
- निर्माल्य गोळा करण्यासाठी ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने
- सुरक्षा व्यवस्थेसाठी ४८ निरीक्षण मनोरे व संरक्षक कठडे.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08646 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..