महात्मा फुले रुग्णालयासाठी रहिवाशांचे आजपासून उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा फुले रुग्णालयासाठी रहिवाशांचे आजपासून उपोषण
महात्मा फुले रुग्णालयासाठी रहिवाशांचे आजपासून उपोषण

महात्मा फुले रुग्णालयासाठी रहिवाशांचे आजपासून उपोषण

sakal_logo
By

मुंबई, ता. ११ : विक्रोळी कन्नमवार नगरमधील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाची पुनर्बांधणी पाच वर्षांपासून रखडली आहे. सध्या रुग्णालय इतर ठिकाणी हलवण्यात आले असले, तरी ते रुग्णांच्या सोयीचे नाही. त्यामुळे त्यांची फरपट सुरू आहे. रुग्णालयाचे काम सुरू करण्यासाठी आता स्थानिक नागरिकच सरसावले आहेत. इमारतीचे काम तत्काळ करून रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी करत सोमवार (ता. १२) पासून साखळी उपोषण करून ते प्रशासनाचे लक्ष वेधून घेणार आहेत.

फुले रुग्णालयाची पुनर्बांधणी करायची असल्याने सध्या ते टागोर नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रसूतिगृहात हलवण्यात आले आहे. तिथे फुले रुग्णालयातील १०० ऐवजी केवळ ५५ रुग्ण खाटा उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील १३ खाटा महिलांसाठी राखीव आहेत. ३० खाटा पुरुष; तर १० आयसीयूसाठी आरक्षित आहेत. गरजेपेक्षा कमी रुग्णखाटा उपलब्ध असल्याने कन्नमवार नगर, विक्रोळी, भांडुप आदी परिसरातील रुग्णांचे हाल होत असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटन महाराष्ट्र राज्याचे निरीक्षक ज्ञानदेव ससाणे यांनी सांगितले.

पाच वर्षांपासून महात्मा फुले रुग्णालयाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना लांबचा प्रवास करावा लागत आहे. मध्यंतरी एका लहान मुलीला उपचाराअभावी प्राण गमवावा लागला होता. त्यामुळे रुग्णालयाचे काम लवकर सुरू करण्यासाठी रहिवासी दोन वर्षांपासून पालिकेच्या आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार करत आहेत. मात्र, आरोग्य विभागाने अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. मात्र, जुन्या रुग्णालयाच्या डागडुजीवर साडेतीन कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च केले, अशी माहिती ससाणे यांनी दिली.

कन्नमवार नगर, पँथर नगर, टागोर नगर, कांजूरमार्ग, सूर्यनगर, विक्रोळी पार्कसाईट, भांडुप आदी परिसरातील रुग्णांवर महात्मा फुले रुग्णालयात उपचार केले जात होते. रुग्णालयाचे काम रखडल्याने रुग्णांची हेळसांड सुरू आहे. पाच वर्षे होऊनही रुग्णालयाचे बांधकाम सुरू झालेले नाही. पालिकेच्या दिरंगाईचा फटका केवळ रुग्णांनाच नाही, तर डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही बसत आहे, असे ज्ञानदेव ससाणे यांनी सांगितले.

कन्नमवार नगर आणि आसपासच्या परिसरात मिळून ८ ते १० लाख लोकसंख्या आहे. त्यांना फुले रुग्णालयाचा मोठा आधार होता. येथील रुग्णांची व्यवस्था डॉ. आंबेडकर प्रसूतिगृहात केली असली, तरी तेथील शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. त्यामुळे रुग्णांना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात जावे लागत आहे. परिणामी तेथील रुग्णांची गर्दी वाढली आहे.

रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांची व्यवस्था डॉ. आंबेडकर प्रसूतिगृहात करण्यात आली आहे. खाटांची संख्या कमी असली, तरी उपचारात हयगय होणार नाही, यासाठी काळजी घेत आहोत. नवीन रुग्णालयाचे काम लवकरच सुरू केले जाईल.
- डॉ. पद्मश्री अहिरे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महात्मा फुले रुग्णालय
.........

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08678 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..