Night School: मुंबईतील रात्र शाळांना बूस्टरची गरज; घटत्या विद्यार्थिसंख्येचे मोठे संकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Night School: मुंबईतील रात्र शाळांना बूस्टरची गरज; घटत्या विद्यार्थिसंख्येचे मोठे संकट
(मुंबई टुडेसाठी)मुंबईतील रात्र शाळांना बूस्टरची गरज

Night School: मुंबईतील रात्र शाळांना बूस्टरची गरज; घटत्या विद्यार्थिसंख्येचे मोठे संकट

मुंबईतील रात्रशाळांना हवे ‘सरकारी’ बूस्टर
विषयनिहाय शिक्षकांची वानवा; घटत्या विद्यार्थिसंख्येचे मोठे संकट

दोन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकटानंतर नियमित शाळा सावरल्या असल्या तरी मुंबईतील रात्रशाळांसमोरील प्रश्न कायम आहेत. एकीकडे घटत्या विद्यार्थिसंख्येचे संकट असतानाच इंग्रजी, गणित आदी विषयांचे शिक्षकही मिळत नसल्याने परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे रात्रशाळांना पाठबळ देण्यासाठी शासन स्तरावरून वेगळे धोरण बनवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एखादे सरकारी बूस्टर मिळाल्यास श्रमिकांचा शैक्षणिक आधारस्तंभ असलेल्या रात्रशाळांचा दर्जा निश्चित उंचावेल.

शिक्षण विभागाच्या उत्तर दक्षिण आणि पश्चिम शैक्षणिक क्षेत्राच्या कार्यक्षेत्रात १२० रात्रशाळा कार्यरत आहेत. सुमारे १२ हजार विद्यार्थी तिथे रोज नोकरी वा कामधंदा करून शिक्षण घेतात. मात्र दोन वर्षांत कोरोना संकटानंतर असंख्य विद्यार्थ्यांचा रोजगार आणि नोकऱ्या गेल्याने त्याचा सर्वात मोठा फटका रात्रशाळांतील उपस्थितीला बसला आहे. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटल्याने त्या संकटात सापडल्या आहेत. त्यातून सावरण्यापूर्वीच शिक्षण विभागातर्फे ३० जून २०२२ रोजी आलेल्या एका शासन निर्णयामुळे त्यांच्यासमोर पुन्हा संकट उभे राहिले असल्याचे रात्रशाळा शिक्षक परिषद, रात्रशाळा शिक्षक सेल आदी संघटनांचे म्हणणे आहे. शासन निर्णयामध्ये विद्यार्थ्यांची संचमान्यता लक्षात घेऊन शिक्षक अर्धवेळच राहतील अशा प्रकारची तरतूद करण्यात आल्याने रात्रशाळांना पूर्णवेळ शिक्षक मिळण्याचे दरवाजे बंद झाले असल्याची भीती शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

अशा आहेत समस्या
- रात्रशाळांतील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्रयोगशाळा आणि त्यासाठीचे साहित्य उपलब्ध होत नाही. अनेकदा खासगी संस्था वा दानशूर व्यक्तींची मदत घ्यावी लागते. शालेय खर्च आणि इतर शुल्कासंदर्भातही खूप मोठे प्रश्न रात्रशाळांच्या विद्यार्थ्यांना भेडसावत असतात.
- मुंबईतील रात्रशाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. ती दूर व्हावी म्हणून मुंबई आणि परिसरामध्ये अतिरिक्त असलेल्या शिक्षकांचे समायोजन रात्रशाळांमध्ये केले जावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
- मुंबईतील इतर शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या ६३० शिक्षकांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक जणांना शाळाबाह्य कामे दिली जातात. उर्वरित शिक्षकांना इतर कामे दिली जात असल्याने ते रात्रशाळांसाठी उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यातील अर्धे शिक्षक जरी रात्रशाळांसाठी उपलब्ध झाले तरी विद्यार्थ्यांची सोय होऊ शकते. त्यांना पूर्णवेळ शिक्षक मिळू शकतील, अशी अपेक्षा रात्रशाळा अभ्यासक व शिक्षक परिषदेचे प्रकोष्ठ निरंजन गिरी यांनी व्यक्त केली.

गणित-इंग्रजी शिक्षकांची वाणवा
मुंबईतील रात्रशाळांमध्ये गणित आणि इंग्रजी विषयांचे शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यावर तोडगा म्हणून ‘मासूम’ संस्थेकडून अनेक शिक्षक पुरवले जातात. हिंदी माध्यमाच्या शिक्षकांचीही मोठी कमतरता आहे. चेंबूर, मुलुंड आदी ठिकाणी असलेल्या हिंदी माध्यमांच्या रात्रशाळांचे कामकाज तर एकाच शिक्षकावर सुरू आहे. कुर्ला येथील एका उर्दू रात्रशाळेत केवळ एकच शिक्षक शिकवत आहे.

मुख्याध्यापकांविना चालतो कारभार
मुंबईतील १२० पैकी केवळ बारा शहरांमध्येच पूर्णवेळ मुख्याध्यापक आहेत. उर्वरित शाळांमध्ये मुख्याध्यापकांविना कारभार सुरू आहे. सेवाज्येष्ठ शिक्षकांना तिथे मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहावे लागते. त्यातच केवळ सात ते आठ शाळांमध्येच लिपिक कार्यरत आहेत. काही शाळांमध्ये लिपिकाचे काम बाहेरून पैसे देऊन करून घ्यावे लागते. मागील सरकारने शिपायांची पदेच बाद करून ती संपुष्टात आणल्याने त्यांचाही प्रश्न रात्रशाळांना भेडसावत आहे. त्यामुळे शिपाई आणि लिपिक पदे भरणे आवश्यक असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले.

भाडे आणि वीजबिलाचा मोठा प्रश्न
मुंबईतील बहुतांश रात्रशाळा महापालिकेच्या शाळांच्या इमारतींमध्ये भरतात. त्यासाठी आकारले जाणारे भाडे माफ केले जावे यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता. तो आयुक्त आणि शालेय शिक्षण स्तरावर अद्याप प्रलंबित असल्याचे रात्रशाळा शिक्षक संघटनांकडून सांगण्यात आले. रात्रशाळांच्या वीजबिलाचाही मोठा प्रश्न आहे. तो सुटल्यास रात्रशाळेतील अनेक प्रश्न मार्गी लागू शकतील. त्यांना मोठा दिलासा मिळू शकेल.

दोन रात्रशाळा एकत्र करण्याचा पर्याय
रात्रशाळांमध्ये कोरोनानंतर विद्यार्थ्यांची संख्या घटली असून दैनिक उपस्थितीवरही त्याचे मोठे परिणाम झाले आहेत. रात्रशाळा सुरळीत सुरू राहण्याची गरज आहे. त्यासाठी त्या त्या परिसरातील नजीकच्या दोन शाळा एकत्र करून त्या पूर्णवेळ रात्रशाळा म्हणून चालवण्याचा एक पर्याय त्यातून निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सरकारने तसा एक विशिष्ट आकृतीबंध तयार करून त्यासाठी नवीन धोरण जाहीर करणे आवश्यक आहे. दोन रात्रशाळांतील विद्यार्थी एकत्र आल्यास त्यांची उपस्थिती अधिक दिसेल आणि संचमान्यता अधिक वाढल्याने शिक्षकांची संख्याही वाढेल. त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होऊ शकेल.

रात्रशाळांसाठी हवे वेगळे धोरण
राज्यात रात्रशाळांसाठी संचमान्यतेचे स्वतंत्र धोरण आवश्यक आहे. २० ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील विद्यार्थी आणि शिक्षकांचे धोरण ठरवण्यात आले होते. त्यामध्ये पहिली ते आठवीच्या ३० विद्यार्थ्यांसाठी आणि नववी-दहावीपर्यंतच्या ४० मुलांकरिता प्रत्येकी एक शिक्षक देण्याची धोरणात्मक तरतूद आहे. मात्र किमान मुंबईत आठवीपर्यंतच्या शाळांमध्ये दहा विद्यार्थ्यांमागे एक आणि नववी ते दहावीच्या २० विद्यार्थ्यांकरिता एक शिक्षक देण्याचे धोरण आवश्यक आहे. त्यामुळे रात्रशाळांना मोठे पाठबळ मिळू शकेल.

नव्या धोरणाकडे लक्ष
मागील सरकारने धोरण जाहीर करूनही ते आणले नव्हते. आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रात्रशाळांसाठी नवीन धोरण दोन महिन्यांत आणण्याचे जाहीर केले आहे. त्यात तरी रात्रशाळांच्या बळकटीसाठी अनेक चांगल्या उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रात्रशाळांसाठी ‘मासूम’चे मोठे योगदान
मुंबईसह राज्यातील रात्रशाळांना नवसंजीवनी देण्यासाठी आणि त्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी ‘मासूम’ संस्थेचे मोठे योगदान राहिले आहे. संस्थेच्या माध्यमातून मुंबईतील ७४ शाळांमधील विद्यार्थ्यांना रोज अल्पोपाहार, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती आदींबरोबरच इतर अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. विशेष म्हणजे ‘मासूम’च्या पुढाकारामुळेच शाळेत लॅपटॉप आणि प्रोजेक्टर पुरवण्यात आले असून त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ होत असल्याचे ‘मासूम’तर्फे सांगण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08679 Txt Mumbai Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :schoolNight College