कमी अधिकाऱ्यांमुळे कारवाईवर मर्यादा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कमी अधिकाऱ्यांमुळे कारवाईवर मर्यादा
कमी अधिकाऱ्यांमुळे कारवाईवर मर्यादा

कमी अधिकाऱ्यांमुळे कारवाईवर मर्यादा

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : सणासुदीच्या काळात भेसळयुक्त आणि निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री होऊनही अन्न व औषध प्रशासन विभागाला (एफडीए) भेसळीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. सणांच्या पार्श्वभूमीवर भेसळ करणाऱ्यांविरुद्धच्या मोहिमेत ‘एफडीए’ने मिठाई, नमकीन इत्यादी खाद्यपदार्थांचे केवळ ९६ नमुने गोळा केले आहेत. संपूर्ण शहरात सुमारे एक लाख मिठाईची दुकाने आहेत. त्यामुळे ‘एफडीए’ची कारवाई नाममात्र मानली जात आहे. कमी कारवाईमागे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे कारण सांगितले जात आहे.

सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री रोखण्यासाठी ‘एफडीए’ने विशेष मोहीम राबवली होती. १ ऑगस्टपासून ती सुरू झाली. ‘एफडीए’चे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार खाद्यपदार्थांमधील गुणवत्ता तपासणीच्या उद्देशाने अधिकाऱ्यांनी १ ऑगस्ट ते ८ सप्टेंबरदरम्यान बाजारात विकली जाणारी मिठाई, नमकीन, तूप आणि खाद्यतेलाचे नमुने गोळा करण्यास सुरुवात केली. गणेशोत्सवाची तयारी आधीच सुरू झाल्यामुळे ‘एफडीए’ने त्यापूर्वीच मोहीम सुरू केली. ‘एफडीए’च्या आकडेवारीनुसार संपूर्ण शहरातून ९६ नमुने घेण्यात आले आहेत.

मोहिमेदरम्यान मुंबईतून मिठाई, फराळ आदींचे केवळ ९६ नमुने गोळा करण्याची ‘एफडीए’ची कारवाई नाममात्र मानली जात आहे. ‘एफडीए’चे अधिकारीही ते पूर्णपणे नाकारत नाहीत. ‘एफडीए’चे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनीही कर्मचाऱ्यांची कमतरता मान्य केली आहे. तपासणीअंतीही दुकानदार निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे शशिकांत केकरे यांनी सांगितले.

पाच लाखांचे खाद्यतेल जप्त
८ सप्टेंबरपर्यंत ९६ पैकी मिठाईचे ५१, फराळाचे ६, खाद्यतेलाचे ७, तूप व वनस्पती तेलाचे १० आणि इतर उत्पादनांचे २२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्याशिवाय ‘एफडीए’ने निकृष्ट दर्जाच्या संशयावरून ४,८४,८२२ रुपये किमतीचे सुमारे २,४०० लिटर खाद्यतेल जप्त केले. त्याचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. २,२०,६६० रुपये किमतीचे निकृष्ट दर्जाचे चॉकलेट आणि चहा पावडरही जप्त करण्यात आली, अशी माहिती शशिकांत केकरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08696 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..