Fire Department robot : अग्निशमन दलाला ‘रोबो’चे बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Department robot
अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन ‘रोबो’

Fire Department robot : अग्निशमन दलाला ‘रोबो’चे बळ

मुंबई : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन नवीन फायर रोबो दाखल होणार आहेत. त्यामुळे शहराप्रमाणेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये आगीच्या गंभीर घटनांच्या वेळी जवानांना मदत मिळणार आहे. दोन रोबोसाठी पावणेतीन कोटी रुपये खर्च केला जाणार असून सप्टेंबरअखेर अग्निशमन दलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. अग्निशमन दलाच्या ताफ्यात २०१९ मध्ये पहिला फायर रोबो दाखल झाला. त्या वेळी त्यासाठी ९८ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. तीन वर्षांपासून तो अग्निशमन दलात कार्यरत आहे. मुंबईतील सिटी सेंटर मॉल, ड्रीम मॉल सनराईज हॉस्पिटल आणि वांद्रे एमटीएनएलमधील भीषण आगीच्या वेळी त्याचा वापर करण्यात आला होता. आगीच्या घटनांमध्ये घटनास्थळी प्रचंड धूर आणि उष्णता निर्माण होते. श्वास घ्यायला त्रास होतो. अशा वेळी अग्निशमन दलाच्या जवानांकडून फायर रोबोचा वापर करण्यात आला. तीन वर्षांमध्ये रोबोने उत्कृष्ट कामगिरी बजावली. म्हणूनच आता आणखी दोन रोबो घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिला रोबो चीनमधून आणण्यात आला होता. आताचे दोन रोबो युरोपमधून घेण्यात येणार आहेत. युरोपिय देश आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आघाडीवर असून त्यांच्याकडे अग्निशमन दलाशी संबंधित उत्पादने चीनच्या तुलनेत अधिक कार्यक्षम बनवली जातात. त्यामुळे युरोपमधून रोबोची खरेदी केली जाणार आहे. जर्मनीमध्ये अग्निशमन दलाशी संबंधित झालेल्या जागतिक तंत्रज्ञान मेळाव्याला ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन रोबोची माहिती घेतली होती. सध्या असलेला रोबो तीन वर्षांपूर्वी घेण्यात आला. त्यानंतर तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल झाले. नवीन रोबोमध्ये अग्निशमन दलाच्या गरजेनुसार बदलही करण्यात येणार आहेत. तीन वर्षांत जवानांना रोबोच्या फायर फायटिंगमध्ये जाणवलेल्या उणिवा भरून काढल्या जाणार आहेत. आवश्यक असलेल्या बदलांची माहिती कंपनीला देण्यात येणार असून त्यानुसार ते करून घेतले जाणार आहेत.

दोन फायर रोबो घेण्यासाठी अग्निशमन दलाने गेल्या जूनमध्ये प्रस्ताव पाठवला आहे. रोबोसाठी २.७५ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. सध्या त्याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या अर्थ खात्याकडे गेला असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. साधारण १५ सप्टेंबरपर्यंत प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षांत दोन्ही रोबो अग्निशमन दलात दाखल होतील. मुंबईत भुयारी मेट्रो आणि कोस्टल रोडसारखे मोठे प्रकल्प येत आहेत. त्याशिवाय भूमिगत तळघरांची संख्याही वाढली आहे. ‘बीएआरसी’सारखी रासायनिक आणि बीपीसीएल व एचपीसीएल अशा पेट्रोकेमिकल कंपन्याही आहेत. पोर्ट ट्रस्टसारखे मोठे प्रकल्प आहेत. त्यासाठी अग्निशमन दलाला अत्याधुनिक यंत्रणांसह सज्ज राहणे काळाची गरज आहे. अशा ठिकाणी आग लागल्यास रोबोचा वापर करता येणार आहे.

नवीन रोबोमध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत. मुंबईत लागणाऱ्या आगीचे स्वरूप पाहता भयंकर उष्णता सहन करील अशा धातूचा वापर केला जाणार आहे. जुन्या रोबोची बॅटरी सलग चार तास चालते. नवीन रोबोची बॅटरी आठ तास चालणारी असेल. नवीन रोबोमध्ये सील बॅटरी टाळण्यात आली आहे. त्यामुळे बाहेरून चार्ज होणारी बॅटरी लावता येणार आहे. नवीन रोबोला चार कॅमेरे असून त्यांची दृश्यमानता अधिक असेल. त्याशिवाय अडथळा पार करण्याची क्षमताही वाढवण्यात आली आहे.सध्या रोबो हाताळण्यासाठी १२ जणांचे विशेष पथक आहे. अशाच प्रकारची आणखी दोन पथके अनुक्रमे पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी तयार केली जातील. त्यांच्याकडे नवीन रोबोची जबाबदारी दिली जाईल. मोठ्या आगीमध्ये ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो. जवानांनी जाणे धोकादायक असलेल्या ठिकाणी रोबोचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी लागणारे ‘फायरमन’ नवीन भरतीमधून भरले जातील.

मुंबईत येणारे नवीन प्रकल्प पाहता सुरक्षेच्या दृष्टीने आणखी दोन रोबो घेत आहोत. प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम प्रतीक्षेत आहे. नवीन रोबोंमुळे शहराप्रमाणे पूर्व आणि पश्चिम उपनगरातील अग्निशमन व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.
- हेमंत परब, मुख्य अग्निशमन अधिकारी

असा आहे रोबो
- पहिला रोबो चीनमधून घेण्यात आला होता. आताचे दोन रोबो युरोपमधून घेण्यात येणार आहेत.
- दोन्ही रोबोंसाठी २.७५ कोटी रुपये खर्च
- अतिशय उष्णता सहन करील अशा धातूचा वापर
- बॅटरी आठ तास चालणार
- अधिक दृश्यमानता असलेले चार कॅमेरे

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08697 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..