वकिलांची भरती परीक्षा मराठीतही घेण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lawyers exam in marathi
वकिलांची भरती परीक्षा मराठीतही घेण्याचे आदेश

वकिलांची भरती परीक्षा मराठीतही घेण्याचे आदेश

मुंबई : राज्यातील सरकारी वकिलांची भरती परीक्षा यापुढे इंग्रजीसह मराठी भाषेतही घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नुकतेच दिले आहेत. रविवारी सरकारी वकील भरतीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मात्र या परीक्षांसाठी संबंधित आदेश लागू नव्हते. आतापर्यंत सरकारी वकिलांच्या परीक्षा या इंग्रजी भाषेतून घेतल्या जात असत. याबाबत न्यायालयाने बारा वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील अधिनस्थ न्यायिक अधिकारी पदाच्या परीक्षा मराठी भाषेत घेण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशांचे पालन अद्यापही सरकारकडून करण्यात आले नाही. न्या. एस. व्ही गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीमधून मूल्यांकन करण्यासाठी सरकार परीक्षकांचा शोध घेत आहे, असा टोला न्यायालयाने लगावला आहे. सरकारी वकील भरतीमधील उमेदवार प्रताप जाधव यांनी मराठीतून परीक्षा घेण्याची मागणी करणारी याचिका ॲड. अलंकार किरपेकर यांच्यामार्फत केली होती. जाधव यांनी यासाठी जूनमध्ये राज्य सरकारला निवेदन दिले होते. मी मराठीमधून शिकलो आहे आणि दंडाधिकारी न्यायालयात मराठीमधून काम चालते. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही परीक्षा घेते. त्यामुळे राज्य सरकारने मराठीमधून परीक्षा घेणे क्रमप्राप्त आहे, असा युक्तिवाद या वेळी करण्यात आला.

सरकारचा खुलासा
यंदाच्या परीक्षेत सुमारे ७७०० उमेदवार आहेत, पण केवळ एकाच उमेदवाराने अशी मागणी केली आहे, तसेच मराठी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी परीक्षक मिळणे कठीण आहे, असा खुलासा सरकारकडून करण्यात आला होता. याचिकादाराने सप्टेंबरमधील परीक्षेसाठी जूनमध्ये निवेदन दिले होते. त्यामुळे सरकारकडे परीक्षक नेमण्यासाठी पुरेसा अवधी होता, असे मत खंडपीठाने नोंदविले.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08702 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..