किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास होणार
किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास होणार

किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास होणार

sakal_logo
By

किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अभ्यास
डॉल्फिनचीही गणना होणार ः १८ महिन्यांची मोहीम

मुंबई, ता. १४ : मुंबई महानगर प्रदेशाच्या किनारपट्टीवरील समुद्री सस्तन प्राण्यांचा अधिवास, त्यांचा विस्तार आणि गणना यांचा अभ्यास येत्या १८ महिन्यांत करण्यात येणार आहे. त्यामध्ये ‘इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन’ आणि ‘फिनलेस पोरपॉइस’ प्रजातींवर प्रामुख्याने काम केले जाईल, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दक्षिण मुंबईच्या बॅक बे क्षेत्रात नुकत्याच झालेल्या एका पथदर्शी अभ्यासात ‘इंडियन ओशन हंपबॅक डॉल्फिन’चे २७ वेळा दर्शन झाले. परिणामी मुंबई महानगर प्रदेशातील सविस्तर अभ्यास करण्यास चालना देण्यात येणार आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाच्या बैठकीत डॉल्फिनच्या गणनेचा निर्णय घेण्यात आला. अभ्यासाअंतर्गत मुंबई किनारपट्टीच्या १० किमीच्या पट्ट्यात आढळणाऱ्या इतर सागरी सस्तन प्राण्यांच्या नोंदी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारे करण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या पहिल्याच अभ्यासात मुंबई महानगरातील साधारण ७० किमी (उत्तर-दक्षिण) किनारपट्टीचा समावेश होणार आहे. वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, की राज्य सरकारने हाती घेतलेला प्रकल्प संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा आहे. ‘डॉल्फिन प्रोजेक्ट’मुळे नद्या व खाड्यांमधील डॉल्फिनच्या संरक्षण व संवर्धनास मोठा हातभार लागण्यास मदत होणार आहे. ऑक्टोबर २०२२ पासून प्रकल्प सुरू होणार असून कांदळवन प्रतिष्ठान आणि कोस्टल कॉन्झर्व्हेशन फाऊंडेशन स्वायत्त संस्थेच्या सहयोगाने तो राबवण्यात येणार आहे. प्रकल्पाचे अभ्यास क्षेत्र उत्तरेकडील वैतरणा नदीच्या मुखापासून सुरू होऊन दक्षिणेकडील ठाणे खाडी आणि मुंबईच्या दक्षिण टोकापर्यंतचा पश्चिम समुद्रकिनारा व्यापेल. बॅक बे, हाजी अली व माहीम खाडीसारख्या अनेक खाड्या आणि एमएमआर क्षेत्रामधील मिठी, दहिसर, पोईसर, ओशिवरा आणि वैतरणा अशा पाच नद्यांच्या मुखांचा त्यात समावेश असेल, जे डॉल्फिन आणि पॉरपॉइज अशा दोन प्रमुख प्रजातींच्या अधिवासाचा अभ्यास करतील. समुद्री सस्तन प्राण्यांच्या अधिवासाची प्राधान्ये, खाद्य आणि मत्स्यव्यवसायाशी त्यांचे परस्पर संबंध तपासण्यासाठी विस्तृतपणे अभ्यास करण्यात येणार आहे. समुद्री सस्तन प्राण्यांच्या प्रजातीला मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे धोके ओळखणे प्रकल्पामागील उद्देश आहे.

कांदळवन प्रतिष्ठानने मुंबई किनाऱ्यानजीकच्या सस्तन प्राण्यांची माहिती मिळवणाऱ्या संशोधन प्रकल्पाचा प्रस्ताव पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाला ‘प्रोजेक्ट डॉल्फिन’अंतर्गत सादर केला आहे. त्या प्रकल्पाची अंदाजित रक्कम ३३.१६ लाख रुपये आहे. त्या अभ्यासामुळे वन अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी होऊन संवर्धनाच्या प्रयत्नांत वाढ होईल.

प्रवाळ भिंतींच्या प्रायोगिक प्रकल्पालाही मान्यता
सीएसआयआर-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था यांना विविध प्रणाली वापरून प्रायोगिक तत्त्वावर कोस्टल रोडच्या समुद्राकडील भागातील निवडक स्थळी प्रवाळ भिंत तयार करण्याकरिता नियामक मंडळाने परवानगी दिली. प्रकल्पाचा कालावधी एक वर्ष असून त्याकरिता ८८ लाखांचा निधी लागणार आहे. मुंबई उपनगरातील व पालघर जिल्ह्यातील पहिल्या कांदळवन निसर्ग परिचय केंद्रालाही बैठकीत मान्यता देण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08744 Txt Thane Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..