पत्राचाळीतील रहिवासी ४० हजार भाड्यावर ठाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्राचाळीतील रहिवासी ४० हजार भाड्यावर ठाम
पत्राचाळीतील रहिवासी ४० हजार भाड्यावर ठाम

पत्राचाळीतील रहिवासी ४० हजार भाड्यावर ठाम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १५ : एक तपाहून अधिक काळ रखडलेल्या गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगरमधील (पत्रा चाळ) मूळ भाडेकरूंना राज्य सरकारने २५ हजार रुपये भाडे देण्याची घोषणा केली आहे; मात्र याबाबतचा अध्यादेश अद्यापही काढलेला नसल्याने रहिवाशांना अद्यापही भाडे मिळाले नाही. सरकारकडून २५ हजार रुपयांची घोषणा केली असली, तरी रहिवासी मात्र ४० हजार रुपये भाड्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे भाड्याचा मुद्दा पुन्हा गाजण्याची चिन्हे आहेत.

म्हाडाच्या ४७ एकर जमिनीवर वसलेल्या सिद्धार्थ नगरच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांची सहकारी गृहनिर्माण संस्था, मे. गुरुआशिष कन्स्ट्रक्शन व म्हाडा यांच्यात त्रिपक्षीय करारनामा झाला होता; मात्र विकसकाने पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे रखडविल्याने आणि रहिवाशांचे भाडे न दिल्याने करारपत्रातील अटींनुसार म्हाडाने विकसक आणि संस्थेस टर्मिनेशन नोटीस जारी केली होती. न्यायालय आणि सरकारच्या आदेशानुसार म्हाडाने पत्राचाळ गृहनिर्माण संस्थेच्या मूळ ६७२ सभासदांच्या पुनर्वसनासाठी आर-९ भूखंडावरील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ केला आहे. कार्यक्रमात माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रहिवाशांना मार्च महिन्याच्या सुरुवातीस भाडे मिळेल, अशी घोषणा केली होती.

दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाने त्रिपक्षीय करारनाम्यानुसार रहिवाशांना १८ हजार रुपये भाडे देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र रहिवाशांनी दरमहा ४० हजार रुपये भाडे देण्याची मागणी लावून धरली होती. रहिवाशांच्या मागणीचा विचार करून राज्य सरकारने रहिवाशांना २५ हजार रुपये भाडे देण्याची घोषणा केली आहे; मात्र या घोषणेनंतरही भाडे देण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात न आल्याने मुंबई मंडळाने रहिवाशांना भाडे देण्याची कार्यवाही सुरू केलेली नाही. त्यातच आता रहिवासीही ४० हजार रुपये भाडे देण्याची मागणी करत आहेत.

सरकारने घोषणा केल्याप्रमाणे २५ हजार रुपये भाडे स्वीकारायचे की ४० हजार रुपये भाडे देण्याची मागणी करायची, याबाबत सदस्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- राजेश दळवी, अध्यक्ष
सिद्धार्थनगर सोसायटी

Web Title: Todays Latest Marathi News Mbi22b08785 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..