पालिकेची क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेची क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम
पालिकेची क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम

पालिकेची क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : कोविडनंतर पालिकेने क्षयरोग व कुष्ठरोग शोधमोहीम हाती घेतली आहे. महापालिकेचा २,८२९ चमू ९ लाख ८६ हजार घरांना देणार भेटी देणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या चमूला सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्याने केले आहे.
भारत सरकारने दिलेल्या उद्दिष्टांनुसार मुंबई महापालिका क्षेत्रात सन २०२५ पर्यंत क्षयरोग दूरीकरणाचे ध्येय, तसेच राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सन २०३० पर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई महापालिका क्षेत्रात २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान ‘सक्रिय संयुक्त क्षयरोग शोध मोहीम’ आणि ‘कुष्ठरोग शोध अभियान’ राबवण्यात येणार आहे.
याबाबत कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. गोमारे यांनी सांगितले की, या मोहिमेदरम्यान साधारणपणे ९ लाख ८६ हजार घरांमधील ४० लाख ३४ हजार ५१३ इतक्या लोकसंख्येची तपासणी ही सार्वजनिक आरोग्य खात्याच्या चमूंद्वारे केली जाणार आहे. यासाठी २ हजार ८२९ चमू कार्यरत राहणार असून हे चमू सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत गृहभेटी देणार आहेत. या प्रत्येक चमूत एक महिला, एक आरोग्य स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक; यानुसार ३ व्यक्तींचा समावेश असणार आहे. या गृहभेटींदरम्यान एखाद्या घरातील कोणताही सदस्य उपलब्ध नसल्यास, सदर चमू त्या घराला घरातील सदस्यांच्या उपलब्धतेनुसार पुन्हा भेट देणार आहे. 

१४ दिवसांपेक्षा जास्त काळ खोकला, संध्याकाळी ताप येणे, लक्षणीय वजन कमी होणे, कफात रक्त येणे, छातीत दुखणे, मानेवर सूज येणे ही क्षयरोगाची लक्षणे आहेत. प्राथमिक तपासणीदरम्यान आढळलेल्या अशा क्षयरोग संशयितांच्या थुंकीची तपासणी आणि एक्स-रे तपासणी नियुक्त केंद्रांद्वारे मोफत केली जाणार आहे. तसेच या मोहिमेदरम्यान नव्याने आढळलेल्या रुग्णांची नोंदणी केली जाईल. अशा रुग्णांना त्यांच्या नजीकची महापालिका आरोग्य केंद्रे, दवाखाने अथवा रुग्णालयांमध्ये पुढील तपासणी करण्यासह उपचारदेखील मोफत दिले जाणार आहेत.
– डॉ. वर्षा पुरी, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी

कुष्ठरोगबाधित रुग्णांच्या त्वचेवर फिकट किंवा लालसर बधीर चट्टा अगर चट्टे येणे, त्या ठिकाणी घाम न येणे, जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे; तसेच तळहातावर वा तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा व जखमा असणे, हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे यांसारखी लक्षणे आढळून येतात. या मोहिमेदरम्यान आरोग्य पथकांद्वारे निदान झालेल्या कुष्ठरोगाच्या संशयितांना महापालिका किंवा सरकारी आरोग्य सुविधांकडे संदर्भित करण्यात येईल व सदर कुष्ठरोग संशयितांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल.
– डॉ. अमिता पेडणेकर, वैद्यकीय अधीक्षक, ॲक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालय