
सावकारांवर कठोर कारवाई करावी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : नाशिक जिल्ह्यातील शेतकरी दीपक जाधव यांच्या आई सत्यभामा यांनी सावकारी जाचाला कंटाळून शेततळ्यात उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही आत्महत्या नसून राज्य सरकारने मोकाट सुटलेल्या सावकारांच्या माध्यमातून अन्नदात्याची हत्या केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला. याप्रकरणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी खासगी सावकारांवर प्रतिबंध लावावा, अशी मागणी आपने केली.
गेल्या अनेक दशकांपासून राज्यात शेतकरी आत्महत्या सर्रास सुरू आहेत. सरकारने त्या रोखण्यासाठी अनेक योजना केल्या; परंतु त्या कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. नुकतेच नाशिकमधील वडाळीभोई येथील शेतकरी दीपक जाधव यांच्या आई सत्यभामा यांनी आत्महत्या केली. कर्जाच्या पाशातून शेतकरी बांधवांची वयोवृद्ध आई आत्महत्या करत असेल तर ही वेळी उद्या आमदार, खासदार, सनदी अधिकाऱ्यांच्या शेतकरी नातेवाईकांवरही येऊ शकते. पोलिसांनी या प्रकरणी त्वरित चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आपचे प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी केली.