
मंडप उभारताना रस्त्यावर खड्डे पाडल्यास दंड
मुंबई, ता. २५ : गणेशोत्सवादरम्यान रस्त्यावर खड्डे पाडल्याने पालिकेने आयोजकांवर दंडात्मक कारवाई केली. आता नवरात्रीत मंडप घालताना रस्त्यावर खड्डे न पाडण्याच्या सूचना पालिकेने सर्व मंडळांना दिल्या आहेत. मंडप तपासणीच्या वेळी रस्ता वा पदपथावर खड्डा आढळून आल्यास प्रत्येक खड्ड्यासाठी २ हजार रुपये दंड आकारणार असल्याचा इशारा मुंबई महापालिकेकडून देण्यात आला आहे.
यंदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने यंदा मुंबई शहर व उपनगरातील नवरात्रोत्सव मंडळांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे शहरातील मैदाने, रस्ते व अन्य सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवीचे मंडप दिसून येतात. मात्र हे मंडप उभारताना अनेक मंडळे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर मंडपाचे बांबू रोवण्यासाठी खड्डा करतात. खड्डे करण्यावर महापालिकेने बंदी घालत खड्डे न करण्याचे आवाहन केले आहे.
...
मंडळांना सूचना
मंडळांच्या मंडपाची उंची २५ फुटांपेक्षा अधिक असल्यास त्या मंडळांना स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. पालिका अधिकारी मंडपाची तपासणी करतील, त्या वेळी हे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचे मंडळांना सूचित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मंडळाने ध्वनिमर्यादा पातळीसंदर्भातील निकषांचेही पालन करणे बंधनकारक असून उत्सव साजरा झाल्यानंतर मंडप व अन्य बांधकाम स्वतःच्या जबाबदारीवर हटवण्यात यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.