HC: अनिल अंबानीना ‘आयकर’ने बजावलेल्या नोटिशाला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HC: अनिल अंबानीना ‘आयकर’ने बजावलेल्या नोटिशाला स्थगिती
अनिल अंबानीना ‘आयकर’ने बजावलेल्या नोटिशाला स्थगिती

HC: अनिल अंबानीना ‘आयकर’ने बजावलेल्या नोटिशाला स्थगिती

sakal_logo
By

मुंबई: स्विस बैकेत पैसे दडवल्याच्या आरोपात उद्योगपती अनिल अंबानी यांना आयकर विभागाने बजावलेला खटला चालवण्यासंबंधीच्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे. यामुळे अंबानी यांना दिलासा मिळाला आहे. रिलायन्स अनिल धीरुभाई अंबानी उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांना आयकर विभागाने मागील महिन्यात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

दोन स्विस बॅंकेत सुमारे ८१४ कोटी रुपये दडवून ठेवल्याचा आरोप आयकर विभागाने त्यांच्यावर केला आहे. ब्लॅक मनी आणि कर आकारणी कायद्याच्या कलम ५० आणि ५१ नुसार ही नोटीस बजावली असून तब्बल ४२० कोटी रुपयांचा कर बुडवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याविरोधात अंबानी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

या कायद्याच्या पूर्वलक्षी प्रभावाने वापर करण्याच्या प्रक्रियेविरोधात विविध न्यायालयांत याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अंबानी यांना २००६ आणि २०१२ मधील व्यवहारांबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. हा कायदा सन २०१५ मध्ये अस्तित्वात आला. त्यामुळे अशी पूर्वलक्षी प्रभावाने कारवाई होऊ शकत नाही. तसेच याबाबत एक दावा अपीलेट न्यायिक अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे आयकर विभाग खटल्याची कारवाई करू शकत नाही, असा युक्तिवाद ॲड. रफिक दादा यांनी केला.

भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
न्यायालयाने आयकर विभागाला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तोपर्यंत अंबानी यांच्यावर कठोर कारवाई करण्यास न्यायालयाने आयकर विभागाला अंतरिम मनाई केली आहे.