Teacher Constituency Elections 2023 : पदवीधर, शिक्षक निवडणुकीची आॅक्टोबरपासून मतदार नोंदणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Constituency Elections 2023
पदवीधर, शिक्षक निवडणुकीची आॅक्टोबरपासून मतदार नोंदणी

Election 2023 : पदवीधर, शिक्षक निवडणुकीची आॅक्टोबरपासून मतदार नोंदणी

मुंबई : नाशिक व अमरावती या विभागांमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या; तर औरंगाबाद, नागपूर व कोकण या विभागांमध्ये शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका २०२३ मध्ये होणार आहेत. त्यासाठी १ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत पात्र शिक्षक, तसेच पदवीधरांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी आज केले. राज्यात पुढील वर्षी होणाऱ्या शिक्षक व पदवीधर निवडणुकीसाठी मतदार नाव नोंदणी मोहीम सुरू करण्यासंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला व्यासपीठावर उपमुख्य निवडणूक अधिकारी तथा अवर सचिव शरद दळवी उपस्थित होते.

देशपांडे म्हणाले, राज्याच्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुका दर सहा वर्षांनी होतात. या निवडणुकांसाठी पात्र शिक्षक, तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. त्या अनुषंगाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी अर्ज क्रमांक १८ भरून पदवीधर नागरिक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या लगतच्या सहा वर्षांतील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक हे मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी अर्ज क्रमांक १९ भरून शिक्षक मतदार नोंदणी करू शकतात. हा अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हे लक्षात ठेवा!
- या पदवीधर, तसेच शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी एकगठ्ठा स्वरूपात प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- पदवीधर व शिक्षक मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रसिद्धी केली जाईल.
- दावे व हरकती घेण्याचा कालावधी २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२२ हा आहे.
- २५ डिसेंबर २०२२ रोजी दावे व हरकती निकालात काढले जातील.
- अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाईल.