मौलाना आझाद महामंडळातील अधिकाऱ्यांना व्यव‍स्‍थापनाचे प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मौलाना आझाद महामंडळातील अधिकाऱ्यांना व्यव‍स्‍थापनाचे प्रशिक्षण
मौलाना आझाद महामंडळातील अधिकाऱ्यांना व्यव‍स्‍थापनाचे प्रशिक्षण

मौलाना आझाद महामंडळातील अधिकाऱ्यांना व्यव‍स्‍थापनाचे प्रशिक्षण

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : राज्यातील विविध अल्पसंख्याक समुदायांचे आर्थिक प्रश्न लक्षात घेऊन त्यांना विविध प्रकारच्या रोजगार उद्योग आणि शिक्षणासंदर्भातील कर्ज मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी त्यांच्या व्यवस्थापनाचे कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (जेबीआयएमएस) मार्फत या महामंडळातील अधिकाऱ्यांना दोन दिवसांचे व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले. यात या महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक जिल्हा सहायक व्यवस्थापक अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. राज्य अल्पसंख्याक विभागाच्या अतिरिक्त सचिव जयश्री मुखर्जी यांच्यासोबतच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण जेबीआयएमएस संस्थेत घेण्यात आले होते. जेबीआयएमएस संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवासन लेयंगार यांनी आपल्या तज्ज्ञ, प्राध्यापक यांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले.
मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत पार पाडली जाते. मंडळातील राज्यभरातील जिल्हा व्यवस्थापक, सहायक जिल्हा व्यवस्थापक लिपिक, टंकलेखक अशा ५०हून अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांना चार सत्रात हे प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये कर्ज वितरित करताना येणाऱ्या विविध प्रकारच्या अडचणी आणि लोकांचे प्रश्न या संदर्भातील कार्यपद्धतीवर सर्वात जास्त भर देण्यात आला होता. तसेच व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नागरिकांना अधिक लाभ कसा देता येईल, यावर या प्रशिक्षणात भर देण्यात आला होता. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले, त्यांना संचालक डॉ. लेयंगार यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कौशल्याचा सर्वाधिक वापर करत आणि कमीत कमी वेळेत कर्मचारी, अधिकाऱ्यांना आपले काम कसे पूर्ण करता येईल, शिवाय लाभार्थ्यांना अधिकाधिक फायदा देण्यासाठी त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण कसा करता येईल, याचा मोठा फायदा या प्रशिक्षणामुळे आमच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार आहे. प्रशिक्षणामुळे कर्जदाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल, हे या प्रशिक्षणातील सर्वांत मोठे यश असणार आहे.
- डॉ. लालमिया शेख, व्यवस्थापकीय संचालक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ