एरांगळ स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एरांगळ स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याचे आदेश
एरांगळ स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याचे आदेश

एरांगळ स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याचे आदेश

sakal_logo
By

मुंबई, ता. २९ : मालाडमधील एरांगळ समुद्र किनाऱ्यावरील जिल्हाधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केलेली हिंदू स्मशानभूमी एका महिन्यात पुन्हा बांधून देण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यामुळे अनधिकृत म्हणून पाडलेली स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याची नामुष्की जिल्हाधिकाऱ्यांवर आली आहे.
या प्रकरणात तक्रार करणारे तक्रारदार आणि न्यायालयात जनहित याचिका दाखल करणाऱ्या याचिकादाराला न्यायालयाने एक लाख रुपये दंड सुनावला आहे. तसेच नव्याने बांधण्यात येणाऱ्या स्मशानभूमीचा खर्च याचिकादार चेतन व्यास यांनीच करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दंडाची रक्कम मच्छीमार बांधवांच्या सोसायटीत जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
व्यास यांनी मागील वर्षी केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, उपनगर जिल्हाधिकारी आणि सागरी किनारा नियमन विभागाला पाहणी करण्याचे निर्देश दिले होते. या पाहणीत स्मशानभूमी अनधिकृत आहे असा निर्वाळा देण्यात आला आणि त्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी स्मशानभूमी पाडण्याची कारवाई केली; मात्र मच्छीमार बांधवांची बाजू ऐकली नाही. मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
...
स्मशानभूमी सीआरझेड अधिसूचनेपूर्वीची...
विशेष म्हणजे ही स्मशानभूमी फेब्रुवारी १९९१ च्या सीआरझेड नियमाच्या अधिसूचनेपूर्वीपासून अस्तित्वात होती आणि तिथे दोन जणांचे अंत्यसंस्कार करण्यात आले होते, हे कागदोपत्री उघड झाले. तसेच महापालिकेच्या नोंदणीमध्ये याची नोंद आहे. महापालिकेच्या वतीने ही बाब मान्य करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी न घेता केलेली कारवाई अयोग्य आहे, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.