गरबा पारंपरिक पद्धतीनेच साजरा व्हावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गरबा पारंपरिक पद्धतीनेच साजरा व्हावा
गरबा पारंपरिक पद्धतीनेच साजरा व्हावा

गरबा पारंपरिक पद्धतीनेच साजरा व्हावा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३० : गरबा आणि दांडिया खेळताना तो पारंपरिक पद्धतीने आयोजित करायला हवा. हा धार्मिक आणि पारंपरिक उत्सव आहे; मात्र त्यासाठी मोठ्या ध्वनिक्षेपक, डीजे किंवा तत्सम आवाजाची आवश्यकता नाही, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.

नागपूरमधील शांतता क्षेत्र असलेल्या मैदानात नवरात्रोत्सव आयोजित करण्याची परवानगी स्थानिक सोसायटीने मागितली होती; परंतु प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यामुळे रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर देवीची आराधना एकाग्रतेने करायला हवी. त्यामध्ये अडथळा येता कामा नये. जे भाविक असतात ते स्वतः आणि इतरांच्या भक्तीत अडथळा किंवा व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेतात, असे नागपूर खंडपीठाने म्हटले आहे.

सशर्त परवानगी
ज्याठिकाणी याचिकादारांना गरबा आणि दांडिया आयोजित करायचा होता, ते एका शाळेचे मैदान आहे आणि त्याच्यालगत रुग्णालय आहे. त्यामुळे येथील परवानगी सशर्त देण्यात आली होती. न्यायालयाने ही परवानगी कायम ठेवली आहे. शांतता क्षेत्र असले तरी परवानगी दिली असून, यासंदर्भात सर्व नियमांचे पालन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आपल्या उत्सवामुळे इतरांना त्रास होत नाही ना, हीच खरी भावना असते आणि नवरात्रीमध्ये शक्तीची पूजा करताना त्यासाठी चित्त शांत असणे आवश्यक आहे, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदविले आहे.