पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर’
पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर’

पाचवी ते आठवीचे विद्यार्थी बनणार ‘स्वच्छता मॉनिटर’

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : महात्मा गांधीजयंती आणि ‘मिशन स्वच्छ भारत’चा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘लेटस् चेंज’ उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये तो राबविण्यात येणार असून पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना त्याअंतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनण्याची संधी मिळणार आहे. त्याची जबाबदारी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे आणि त्यांना त्याची सवय लागावी, या उद्देशाने त्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्यात येणार आहे. त्यासाठी मिशन स्वच्छ भारत योजनेअंतर्गत ‘लेटस् चेंज’ उपक्रम होत आहे. २ ऑक्टोबर रोजी शालेय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांना व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करून स्वच्छता मॉनिटर म्हणून जबाबदारी स्वीकारण्याबाबतच्या कल्पनेचा परिचय करून देतील. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ७५ मिनिटांचा ‘लेटस् चेंज’मनोरंजनात्मक चित्रपट प्रसारित केला जाईल. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लोकप्रिय व्यक्तींच्या व्हिडीओ संदेशाद्वारेही कृती योजनेच्या आराखड्याची माहिती देण्यात येणार आहे.

जाहीर सत्कार होणार
उपक्रमांतर्गत निष्काळजीपणे कचरा करणाऱ्यांशी संवाद साधून ‘स्वच्छता मॉनिटर’ झालेले विद्यार्थी स्वच्छतेचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून देतील. स्वच्छतेबाबत सातत्याने प्रचार-प्रसार झाल्यामुळे कचरा करणाऱ्यांमध्ये सुधारणा होऊन परिसर स्वच्छ राहील. सफाई कर्मचाऱ्यांवरील भारही कमी होईल. उपक्रमांतर्गत उत्तम कामगिरी करणाऱ्या ‘स्वच्छता मॉनिटर’चा जाहीर सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत कळवण्यात आले आहे.