राणी बागेत कोई फिश पॉड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राणी बागेत कोई फिश पॉड
राणी बागेत कोई फिश पॉड

राणी बागेत कोई फिश पॉड

sakal_logo
By

प्याऊंना ‘कोई फिश पॉड’चा साज
राणीच्या बागेत देशातील पहिलाच प्रयोग

मिलिंद तांबे, मुंबई
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात (राणी बाग) चार ऐतिहासिक पाणपोया (प्याऊ) आहेत. सध्या त्यांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. त्यातील पडिक असलेल्या सेठ समलादास नासीदास प्याऊलाही नवा साज देण्यात येत आहे. जीर्णोद्धार करताना हेरिटेज विभागाने ‘कोई फिश पॉड’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या त्याचे काम अंतिम टप्प्यात असून ‘कोई फिश’ असणारा राणीच्या बागेतील प्याऊंचा प्रयोग देशात पहिला ठरला आहे.


राणीच्या बागेत अनेक हेरिटेज वास्तू आहेत. त्यांचे निरीक्षण करताना हेरिटेज विभागाला जुनी विहीर सापडली. त्या विहिरीत पूर्वी कारंजे असल्याचे अधिकारी सांगतात. बागेत चार हेरिटेज पाणपोया आहेत. त्यांपैकी सेठ समलादास नासीदास प्याऊची फारच दुरवस्था झाली होती. दुभंगलेल्या एका प्याऊच्या केवळ मधला भाग अधिकाऱ्यांना बागेतच एका कोपऱ्यात पडलेला आढळला. अपूर्ण प्याऊच्या वरच्या भागाची डागडुजी करण्यात आली. खालील भागही नव्याने तयार करून तो पडिक विहिरीमध्ये बसवण्याचे ठरले. जुन्या विहिरीला पॉडचा आकार देण्यात आला असून त्याची खोली दीड मीटर ठेवण्यात आली आहे.
पॉडचा व्यास नऊ मीटर आहे. त्यात दुरुस्त करण्यात आलेला प्याऊचा दगडी नक्षीदार तुकडा बसवण्यात आला आहे. त्याला कारंजाचे स्वरूप देण्यात आले असून त्याच्या चार बाजूंना असलेल्या सिंहांच्या तोंडातून पाणी वाहणार आहे. त्यासाठी पाण्याची मोटार बसवण्यात येणार असून कारंज्यातून पडणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर केला जाणार आहे.

हेरिटेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला नवीन ‘कोई फिश पॉड’ वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारंज्यातून पडणारे पाणी तीन स्तरावरून खाली कोसळते. त्यातील पहिली कडा नव्याने बनवण्यात आली आहे. उर्वरित दोन कडा जुन्या विहिरीचाच भाग आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्याचे नक्षीकाम वर्तुळाकार असल्याने त्यातून समांतर पाणी पडणे आवश्यक होते. पॉडचे काम नैसर्गिक दगडात करण्यात आले असल्याने ते अत्यंत नजाकतीने साकारल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काय आहे कोई फिश?
‘कोई फिश’ जपानमध्ये आढळणारे रंगीत मासे आहेत. जपानी व्यक्ती त्यांना शुभ मानतात. ‘कोई फिश’मुळे वातावरणात सकारात्मकता येते, अशी त्यांची धारणा आहे. अशा प्रकारचे मासे राणी बागेतील ‘कोई फिश पॉड’मध्ये टाकण्यात येणार आहेत. आठ महिन्यांपासून प्रकल्पावर काम सुरू आहे. सध्या ते अंतिम टप्प्यात असून दिवाळीमध्ये पूर्ण होणार असल्याचे अधिकारी सांगतात. उद्यानातील सर्व प्याऊंच्या जीर्णोद्धारासाठी एक कोटी तीन लाख रुपये खर्च केला जात आहे.

‘पॉड’च्या आजूबाजूचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कोई मासे तलावात सोडले जातील. दरम्यान, मत्स्य तलावातील पाणी शुद्धीकरण यंत्रणेची चाचणी केली जाणार आहे. त्यानंतर त्यामध्ये जापनीज कोई फिश टाकण्यात येणार आहेत. अशा प्रकारचा देशातील हा पहिला प्रयोग ठरणार आहे.
- संजय सावंत, प्रमुख, हेरिटेज विभाग

१०० वर्षे जुन्या प्याऊ
मुंबई महापालिकेने राणीच्या बागेत चार प्याऊंची पुनर्बांधणी केली आहे. तीन प्याऊ मूळ संरचनेत केले गेले आहेत. एक प्याऊ कोई फिश पॉड म्हणजेच पाण्याच्या कारंज्यामध्ये पुनर्संचयित करण्यात येत आहे. पालिकेने नोव्हेंबर २०२१ मध्ये चार प्याऊंचा प्रकल्प हाती घेतला. खिमजी मूलजी रांदेरिया प्याऊ, अर्देशीर दादीशेट प्याऊ (दोन) आणि सेठ समलादास नासीदास प्याऊ अशी त्यांची नावे आहेत. चारही प्याऊ सुमारे १०० वर्षे जुन्या असून त्या १९०३ ते १९३३ दरम्यान बांधल्या गेल्या आहेत.