अकरावीच्या दैनंदिन गुणवत्ता फेरी १५ ऑक्टोबरपर्यंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकरावीच्या दैनंदिन गुणवत्ता फेरी १५ ऑक्टोबरपर्यंत
अकरावीच्या दैनंदिन गुणवत्ता फेरी १५ ऑक्टोबरपर्यंत

अकरावीच्या दैनंदिन गुणवत्ता फेरी १५ ऑक्टोबरपर्यंत

sakal_logo
By

मुंबई, ता. १ : मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अद्यापही ७७ हजारहून अधिक जागा रिक्त आहेत. या जागांच्या प्रवेशासाठी राबवण्यात येत असलेली अकरावीची दैनंदिन गुणवत्ता फेरी १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले प्रवेश निश्चित करण्याची आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे; मात्र हे प्रवेश सरकारी सुटीच्या दिवशी बंद राहणार असल्याची माहिती शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली आहे.

मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत दैनंदिन गुणवत्ता प्रवेश फेरी राबवण्यात आली होती. यादरम्यान ८२ हजार २०६ जागा रिक्त होत्या; त्यापैकी केवळ पाच हजार १३१ जागांवरच प्रवेश झाले असून, उर्वरित तब्बल ७७ हजार ३७१ जागा रिक्तच आहेत. या जागांमध्ये विद्यार्थ्यांकडून अधिक गुण नसतानाही चुकीची पसंती दर्शवली जात असल्यामुळे त्यांचे हे प्रवेश होऊ शकले नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांमध्ये रिक्त जागांवर प्रवेश उपलब्ध व्हावेत, यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत दैनंदिन गुणवत्ता फेरी राबवली जाणार आहे.

मुंबईतील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये पहिल्या आणि विशेष फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. काही महाविद्यालयांमध्ये अद्यापही जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांना पसंतीक्रम आणि इतर बाबतीत खबरदारी घेण्याची ताकीद शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. पहिल्या आणि विशेष फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले आहेत. १५ ऑक्टोबरनंतर कोणतीही प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार नसल्याचेही सांगण्यात आले.