न्यायाधिशांच्या नियुक्तीबाबत खुलासा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायाधिशांच्या नियुक्तीबाबत खुलासा करा
न्यायाधिशांच्या नियुक्तीबाबत खुलासा करा

न्यायाधिशांच्या नियुक्तीबाबत खुलासा करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : मुंबई उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्त्या जलदगतीने कराव्यात, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज केंद्र आणि राज्य सरकारला दोन आठवड्यांत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या विधी विषयाच्या प्राध्यापिका डॉ. शर्मिला घुगे यांनी न्यायालयात याचिका केली आहे.

उच्च न्यायालयाची मंजूर न्यायाधीश पदे ९४ आहेत; परंतु ही पदे पूर्णपणे नियुक्त केलेली नाहीत. त्यामुळे तोपर्यंत निवृत्त न्यायाधीशांना तात्पुरते सेवा-शर्तींसह नियुक्त करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे. राज्य घटनेच्या अनुच्छेद २२४ अ नुसार ही नियुक्ती असावी, असे याचिकादारांचे म्हणणे आहे. याचिकेवर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी पुढील सुनावणीमध्ये यावर बाजू मांडावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात सध्या ४४ कायम, तर १८ अतिरिक्त न्यायाधीश आहेत. यापैकी काही जण आता निवृत्त होणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयात नव्या न्यायाधीशांची नियुक्ती आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद केले आहे. उच्च न्यायालयात हजारो याचिका प्रलंबित आहेत. केंद्र सरकार न्यायालयाची मंजूर क्षमता वाढवत असले तरी त्या क्षमतेत न्यायाधीश नियुक्त करण्यात येत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया जलदगतीने व्हावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.