राहुल मुखर्जी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राहुल मुखर्जी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा!
राहुल मुखर्जी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा!

राहुल मुखर्जी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा!

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : शीना बोरा हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार राहुल मुखर्जी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे, असा दावा आज विशेष न्यायालयात आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या वतीने करण्यात आला. राहुल इंद्राणीचा सावत्र मुलगा आहे. विशेष म्हणजे शीना ही इंद्राणी मुखर्जीची मुलगी आहे, असे अखेर १० वर्षांनंतर इंद्राणीच्या वतीने मान्य करण्यात आले आहे. या खटल्यात सध्या राहुल मुखर्जीची साक्ष नोंदविण्यात येत आहे.

राहुल आणि शीना एकमेकांच्या प्रेमात होते; मात्र प्रारंभी इंद्राणीने ती तिची बहीण असल्याचे सांगितले होते. राहुल आणि शीनाच्या प्रेम संबंधांना इंद्राणीचा विरोध होता आणि त्यातून तिची हत्या घडवून आणल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. आज विशेष न्यायालयात इंद्राणीचे वकील ॲड. रणजित सांगळे यांनी राहुलची उलटतपासणी केली. ‘शीना इंद्राणीची बहीण नसून मुलगी आहे कळल्यानंतर तिच्याशी संबंध ठेवणे नैतिकरितीने योग्य होते का, ती तुझी बहीण होती ना,’ असा प्रश्न राहुलला विचारण्यात आला. ‘आम्ही रक्ताचे नातेवाईक नव्हतो, मग त्यात गैर काय, त्यामुळे एकत्र राहण्याचा निर्णय दोघांनीही सहमतीने घेतला होता’, असे उत्तर राहुलने दिले. इंद्राणीने प्रारंभी शीना स्वतःची बहीण आहे, असे सांगितले होते; मात्र तिच्या मृत्यूनंतर ती इंद्राणीची पहिली मुलगी असल्याचे उघड झाले होते. आज न्यायालयात तिच्या वतीने उलट तपासणीमध्ये हे मान्य करण्यात आले.