बिल्डरांपासून अंतर राखा, लोकहिताचे निर्णय घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिल्डरांपासून अंतर राखा, लोकहिताचे निर्णय घ्या
बिल्डरांपासून अंतर राखा, लोकहिताचे निर्णय घ्या

बिल्डरांपासून अंतर राखा, लोकहिताचे निर्णय घ्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३ : मुंबई महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांपासून अंतर ठेवून रहावे आणि रहिवाशांच्या हिताच्या भूमिकेतून निर्णय घ्यावे, असा सूचक सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणात पालिकेला दिला आहे.

मुंबई उपनगरातील एका इमारतीतील भाडेकरूंना हटविण्यासाठी पालिकेच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत बांधकाम व्यावसायिक आणि रहिवाशांमध्ये वाद सुरू आहेत. त्यामुळे न्यायालयाने २०१८ मध्ये इमारतीत राहण्यासाठी रहिवाशांना परवानगी दिली होती. आता ही परवानगी रद्द करण्यासाठी पालिकेच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला. याचिकेवर न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. या अर्जात गुणवत्तेचा अभाव असून बिल्डरच्या हितासाठी अर्ज केल्याचे प्रतित होते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

भाडेकरूंना कायमस्वरूपी घर देण्याची व्यवस्था अद्याप बिल्डरने केलेली नाही आणि त्यांना जागेतून हटविण्यात येत आहे, असे म्हणत खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. जर हा अर्ज मंजूर केला तर भाडेकरू रस्त्यावर येतील, अशी शक्यता न्यायालयाने व्यक्त केली. दरम्यान, आम्हाला अद्याप घरे मिळाली नाही, असे भाडेकरूंनी निदर्शनास आणले. न्यायालयाने यावरून महापालिकेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. पालिकेने रहिवाशांना हितकारक ठरेल, अशा दृष्टीने काम करायला हवे, असे खंडपीठाने सुनावले आणि अर्ज नामंजूर केला.