सीबीआयच्या तक्रारीवर जामिनासाठी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीबीआयच्या तक्रारीवर जामिनासाठी अर्ज
सीबीआयच्या तक्रारीवर जामिनासाठी अर्ज

सीबीआयच्या तक्रारीवर जामिनासाठी अर्ज

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ६ : मनीलॉण्डरिंग प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर आता सीबीआयने दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीत जामीन मिळण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर १४ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने देशमुख यांना ईडीच्या प्रकरणात नुकताच सशर्त जामीन मंजूर केला आहे; मात्र सीबीआयनेदेखील देशमुख यांच्यावर खंडणीवसुलीच्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन न मिळाल्यामुळे त्यांना कारागृहातच राहावे लागत आहे. त्यामुळे ॲड. अनिकेत निकम यांच्यामार्फत त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे.

वाढते वय, त्यामुळे निर्मिती होणारे आजार आणि खांदे दुखी अशी कारणे त्यांनी दिली आहेत. तसेच आतापर्यंत तपासात वेळोवेळी सहकार्य केले आहे. माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा तपास यंत्रणेकडे नाही, असा दावा त्यांनी केला आहे. अर्जाचा उल्लेख आज न्यायालयात करण्यात आला. न्यायालयाने १४ ऑक्टोबरला यावर सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रात देशमुख यांना एक लाख रुपयांचा जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर मार्गाने बेहिशोबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपांवर कर उल्लंघन कारवाई होऊ शकते. पण लावलेले आरोप आणि ही मालमत्ता यांचा संबंध स्पष्ट होत नसेल तर आर्थिक गुन्ह्याचा आरोप होऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे. ज्या साक्षीदारांचे जबाब ईडीने घेतले आहेत, त्यावरून देशमुख यांनी कसे पैसे घेतले आणि कोणता गुन्हा केला, हे स्पष्ट होत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे प्रथम यामध्ये आरोपी होता आणि आता माफीचा साक्षीदार आहे. त्यामुळे त्याचा जबाब किती वापरायचा याचा, विचार करावा लागेल असेही न्यायालय नोंदविले आहे.