धारावीत झोपडपट्टी पुनर्विकासाला विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीत झोपडपट्टी पुनर्विकासाला विरोध
धारावीत झोपडपट्टी पुनर्विकासाला विरोध

धारावीत झोपडपट्टी पुनर्विकासाला विरोध

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ८ : धारावीत झोपडपट्टी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामुळे धारावी पुनर्विकासाला गती मिळाली आहे; मात्र प्रकल्पातील पूर्वीच्या सेक्टर एकमधील इमारत आणि चाळीतील रहिवाशांनी पुनर्विकासाला विरोध दर्शवत पुनर्विकास प्रकल्पात ४०५ चौरस फुटांऐवजी कायद्याप्रमाणे ६८७ चौरस फुटांचे घर देण्याची मागणी केली आहे.

धारावीचे क्षेत्रफळ सुमारे ५२७ एकर असून पुनर्विकासासाठी यापूर्वी पाच सेक्टर करण्यात आले होते. त्याऐवजी धारावीचा एकात्मिक विकास करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रकल्पाने निविदा मागवल्या आहेत; मात्र पूर्वीच्या सेक्टर-१ मधील इमारती आणि चाळीत वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या क्षेत्रफळाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. धारावी पुनर्विकासात २५० चौरस फुटांच्या घरांसाठी ४०५ चौरस फुटांचे घर दिले जाणार आहे; मात्र २०३४ च्या विकास आराखड्यानुसार ३०० चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचे घर असले तरीही त्यांना ६८७ चौरस फुटांचे घर कायद्याने मिळाले पाहिजे, अशी मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प कृती समितीचे समन्वयक विवेक कांबळे यांनी केली आहे.