कांदिवलीत तीन नवीन पूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांदिवलीत तीन नवीन पूल
कांदिवलीत तीन नवीन पूल

कांदिवलीत तीन नवीन पूल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : मुंबई महापालिकेने कांदिवलीच्या पश्चिमेला तीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यातील दोन पूल वाहनांसाठी; तर एक पूल पादचाऱ्यांसाठी असणार आहे. या पुलांसाठी तब्बल ५६ कोटी रुपये खर्च पालिका करणार असून लवकरच याची निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
पश्चिम उपनगरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. त्यातच कांदिवली रेल्वे स्टेशन पश्चिमेकडून चारकोप व गोराईकडे जाणाऱ्या मार्गावर नेहमीच लोकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यासाठी तेथील जुन्या पुलांची डागडुजी व नवीन पूल उभारण्यावर पालिकेने भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून पोयसर नदीजवळ पारेख नगर येथील जुना पादचारी पूल तेथे नवीन पूल उभारण्यात येणार आहे; तर अजून तीन नवीन पूल बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

ये‍थे असतील पूल
कांदिवली पश्चिम येथील शंकर लेन आणि इराणी वाडी रोड क्र. ४ ला जोडणारा पूल तसेच जवाहरलाल रामसुमेर यादव मार्ग येथील पोयसर नदीच्या बी शाखेकडील जुने पूल पाडून नवीन पूल उभारण्यात येणार आहेत. इंडिया नगर, एम. जी. रोड क्र. १ येथील जुना पूलदेखील पाडण्यात येणार आहे. पोयसर आणि इंडिया नगर पुलांवरून पादचारी व गाड्यांची वाहतूक सुरू राहील.

कंत्राटदारांसाठी कडक नियमावली
पूल उभारण्यासाठी निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांसाठी कडक नियमावली तयार केली असून काळ्या यादीमध्ये असलेल्या व ज्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहेत, अशा कंत्राटदारांना निविदा भरता येणार नाहीत. तसेच पालिका, केंद्र, राज्य सरकार, निमसरकारी संस्था, केंद्रीय व राज्य सार्वजनिक क्षेत्रामधील उपक्रमामध्ये काम करण्याचा अनुभव असणाऱ्या कंत्राटदाराला निविदा प्रक्रियेत सहभागी व्हायचे असल्यास पालिकेत नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.