ऋतूजा लटकेंचा राजीनामा मंजूर करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋतूजा लटकेंचा राजीनामा मंजूर करा
ऋतूजा लटकेंचा राजीनामा मंजूर करा

ऋतूजा लटकेंचा राजीनामा मंजूर करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १३ : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या (ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मंजूर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज मुंबई महापालिकेला दिले आहेत. ‘एका कर्मचाऱ्याचा राजीनामा मंजूर करण्यात एवढा वेळ कशाला घेता, त्यांना निवडणूक लढवायची आहे तर लढवू द्या ना, महापालिका आयुक्त कशाला आडकाठी घेऊन मनमानीपणे वागत आहेत’, अशा शब्दांत न्यायालयाने महापालिकेला फटकारले.

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या वतीने लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लटके पालिकेत कारकून पदावर काम करतात. निवडणूक लढण्यासाठी त्यांना नोकरीचा राजीनामा देणे आवश्यक आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी सप्टेंबरमध्ये महापालिका अधिकाऱ्यांना राजीनामा सादर केला; मात्र ते राजीनामापत्र त्रुटीपूर्ण आहे, असे कारण देऊन सप्टेंबरअखेरीस अमान्य करण्यात आले. लटके यांनी पुन्हा दुसरा राजीनामा दिला. तोदेखील आजपर्यंत अधिकाऱ्यांनी मंजूर केला नाही. त्यामुळे लटके यांनी ॲड. विश्वजित सावंत यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे.

न्या. नितीन जामदार आणि न्या. शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने आज ही याचिका मंजूर केली आणि महापालिकेला लटके यांचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचे आदेश दिले. तसेच न्यायालयाने महापालिकेच्या भूमिकेवर तीव्र नाराजीही व्यक्त केली. राजीनामा मंजूर करण्याचा मुद्दा न्यायालयात आल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. अशी प्रकरणे न्यायालयात यायलाच नको. आयुक्तांनी यावर निर्णय घ्यायला हवा होता, यापूर्वी अशी प्रकरणे मंजूर झाली, मग आता भेदभाव का, असा प्रश्न न्यायालयाने केला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत लटके यांचा राजीनामा स्वीकारल्याचे पत्र देण्याचे अंतरिम आदेश खंडपीठाने पालिकेला दिले. याबाबत सविस्तर निकालपत्र खंडपीठ लवकरच देईल, असेदेखील न्यायालयाने स्पष्ट केले.
--------

‘विशेषाधिकार योग्य ठिकाणी वापरावा’
एका कारकुनाला राजीनामा द्यायचा आहे आणि निवडणूक लढवायची आहे. तुम्ही तुमचा विशेषाधिकार वापरून त्यावर हो किंवा नाही हा निर्णय द्यायचा होता, त्यासाठी एवढा वेळ कशाला घेतला, तो तुमचाच कर्मचारी आहे ना! मग तुम्ही त्यांना मदत करायला हवी होती. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मग तुम्ही तुमचा विशेषाधिकार कधी वापरणार, असा प्रश्न न्यायालयाने आयुक्तांना केला. अधिकाऱ्यांनी हा विशेषाधिकार योग्य कारणांसाठी वापरायचा असतो, पण इथे अधिकारी दूषित हेतू वापरत आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
-------

राजकीय दबाव?
लटके यांच्याविरोधात कोणतीही चौकशी किंवा कर्ज प्रलंबित नाही, तरीदेखील आयुक्त राजकीय दबावामुळे त्यावर निर्णय घेत नाहीत, असा युक्तिवाद ॲड. विश्वजित सावंत यांनी केला; तर लटके यांच्याविरोधात तक्रार प्रलंबित आहे आणि राजीनामा मंजूर करणे हा आयुक्तांचा अधिकार आहे, असा दावा पालिकेच्या वतीने ॲड. अनिल साखरे यांनी केला; मात्र कोणतीही तक्रार प्रलंबित नसून राजकीय दबाव आणला जात आहे, असे ॲड. सावंत यांनी सांगितले.
---

राजीनाम्याच्या प्रक्रियेला गती
न्यायालयाच्या आदेशानंतर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याच्या प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला. उद्या (शुक्रवार) ११ वाजेपर्यंत राजीनामा सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानंतर पालिकेतही राजीनाम्याची औपचारिकता पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. पालिकेतील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत लटके यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया आणि औपचारिकता पूर्ण होईल.
-------

न्यायदेवतेवर माझा विश्वास होता. माझ्या याचिकेवर सुनावणी झाली, मला न्याय मिळाला. दिवंगत आमदार रमेश लटके यांनी जे कार्य केले आहे, त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणार आहे. राजीनामा मंजूर होताच मी उमेदवारी अर्ज भरायला जाणार आहे.
- ऋतुजा लटके, संभाव्य उमेदवार