राज ठाकरेंचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज ठाकरेंचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा
राज ठाकरेंचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा

राज ठाकरेंचा ऋतुजा लटकेंना पाठिंबा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. पतीच्या निधनानंतर निवडणूक लढवत असणाऱ्या ऋतुजा यांच्याविरोधात उमेदवार उभा न करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच, भारतीय जनता पक्षानेही त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करू नये, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

या पत्रामध्ये राज ठाकरे यांनी लिहिले आहे की, आमदार रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखाप्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने आमदार होण्याने रमेश यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. भारतीय जनता पक्षाने ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावे, अशी विनंती राज यांनी केली आहे. मी आमच्या पक्षातर्फे अशा परिस्थितीत जेव्हा दिवंगत आमदाराच्या घरच्या व्यक्ती निवडणूक लढवतात तेव्हा शक्यतो निवडणूक न लढवण्याचे धोरण स्वीकारतो. तसे करण्याने आपण त्या दिवंगत लोकप्रतिनिधीला श्रध्दांजलीच अर्पण करतो, अशी माझी भावना आहे. आपणही तसे करावे, असे मला माझे मन सांगते. असे करणे हे आपल्या महाराष्ट्राच्या महान संस्कृतीशी सुसंगतही आहे. मला आशा आहे आपण माझ्या विनंतीचा स्वीकार कराल. अशी अपेक्षाही ठाकरे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.