ज्योती जगताप यांची जामीन याचिका फेटाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्योती जगताप यांची जामीन याचिका फेटाळली
ज्योती जगताप यांची जामीन याचिका फेटाळली

ज्योती जगताप यांची जामीन याचिका फेटाळली

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी ज्योती जगताप यांची जामीन याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळली. जगताप यांच्याविरोधात तपास यंत्रणेने दाखल केलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य दिसते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
एनआयएने जगताप यांना सप्टेंबर २०२० मध्ये अटक केली होती. विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. अजय गडकरी आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. बंदी घालण्यात आलेल्या माओवादी संघटनेच्या त्या प्रत्यक्ष सदस्य आहेत आणि त्यांचा म्होरक्या मिलिंद तेलतुंबडेकडून त्यांना आदेश दिले जात होते, असा आरोप एनआयएने केला आहे. तेलतुंबडे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये पोलिस चकमकीत ठार झाला आहे.
जगताप यांच्या वतीने ॲड. मिहिर देसाई यांनी बाजू मांडली. पुणे पोलिसांनी गैरसमजुतीने जगताप यांना अटक केली आहे, असा दावा त्यांनी केला आहे. त्या एल्गार परिषदेच्या आयोजक आहेत, असे एनआयए म्हणते; तर पुणे पोलिसांनी आरोपी सुधीर ढवळे आणि कबीर कला मंचचे अन्य काही जण आयोजक आहेत, असा आरोप केला आहे. यामुळे दोन्ही तपास यंत्रणा विभिन्न दावे करत आहेत, असा युक्तिवाद त्यांनी केला. अद्याप आरोप निश्चित झाले नाहीत आणि खटला सुरू व्हायला वेळ लागेल. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली.