मुंबईकर रमले खरेदीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकर रमले खरेदीत
मुंबईकर रमले खरेदीत

मुंबईकर रमले खरेदीत

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : कोरोना महामारीनंतर सर्वच सण यंदा दोन वर्षांच्या कालावधीनंतर उत्स्फूर्त उत्साहाने साजरे केले जात आहेत. गणेशोत्सव, नवरात्री आणि दसऱ्यानंतर आता मुंबईच्या सर्वच बाजारांत दिवाळी खरेदीच्या उत्साहाचे उधाण आले आहे. काही दिवसांपासून मुंबईतील बाजारांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे. काल रविवारी सुट्टीच्या दिवशी खरेदीसाठी सर्वत्र झुंबड उडाली होती. आज सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली.

मुंबईच्या दादर बाजारात पणत्या, कंदील, छोटे दिवे, कपडे, साड्या, रंग, रांगोळी, आकाशकंदील, पणत्या, सजावटीचे साहित्य, माळा, लक्ष्मीच्या मूर्ती, किल्ले, मावळ्यांच्या प्रतिकृती, केरसुण्या, पूजेचे साहित्य, फराळ आदी साहित्य विकणारे फेरीवाले रस्त्याच्या दुतर्फा अवतरले आहेत. कपडे खरेदीलाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक बाजारांबरोबरच मॉल आणि ब्रॅण्डेड दुकानांमध्येही मुंबईकर प्रचंड गर्दी करत आहेत. फराळ आणि ड्राय फ्रूट्स खरेदीसाठी गर्दी होत आहे. प्रत्येक आवश्यक वस्तू एकाच ठिकाणी मिळते अशी ओळख असलेल्या लालबागच्या बाजारातही मुंबईकरांनी सोमवारी खरेदीसाठी गर्दी केली होती. दोन वर्षांच्या निरुत्साही वातावरणानंतर रंगीबेरंगी दिवे, माळा आणि आकाशकंदील यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.

दादरमधील एका दुकानमालकाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी कुर्ता, शर्ट आणि पारंपरिक वेशभूषा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची फार गर्दी होती. काल दिवसभर दुकानात पाय ठेवण्यासाठी जागा नव्हती. रात्री ११ वाजले तरी दुकानात धावपळ सुरू होती. पुढील पाच दिवस अधिकच गर्दी असेल असे त्याने स्पष्ट केले.

लालबाग न्यू मार्केटचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संकेत खामकर म्हणाले, की येणारा शनिवार-रविवार खरेदीसाठीचा शेवटचा दिवस आहे; पण आता ऑनलाईनही ऑर्डर येत आहेत. चकली पीठ, मसाले आणि कंरजीचे सारण असे सर्व पदार्थ ऑनलाईन मागणीनुसार पुरवले जातात. दोन वर्षांचा बॅकलॉग भरून निघेल. प्रवास खर्च आणि पेट्रोल-डिझेल महागल्याने थोडेसे दर वाढले आहेत.

यंदा जास्त प्रतिसाद
दर काही प्रमाणात वाढले असले तरी रेडीमेड फराळालाही यंदा वाढती मागणी आहे. रेडीमेड फराळाचा व्यवसाय आधीपासून करत आहोत; पण यंदा गेल्या वर्षीपेक्षा उत्साह आणि प्रतिसाद दोन्हीही जास्त आहे. शंकरपाळी आणि चकलीला जास्त मागणी आहे. नवरात्रीनंतर फराळ बनवण्यास सुरुवात करतो. त्यातून जवळपास ३५ महिलांना रोजगार उपलब्ध होतो, असे दादरमधील फराळ विक्रेत्या अरुधंती चारी यांनी सांगितले.

सुवासिक उटण्यांना मागणी
यंदा घरगुती सुवासिक उटण्यालाही सर्वाधिक प्रतिसाद आहे. मातीच्या भांड्यात पारंपरिक औषधी वापरून तयार केलेल्या उटण्यामुळे त्वचेला कोणताही अपाय होत नाही, असे विक्रेत्यांनी सांगितले.

उपनगरांतही झुंबड
मालाड (बातमीदार) ः दिवाळीनिमित्तच्या खरेदीसाठी सोमवारी गोरेगाव, मालाड, कांदिवली आणि बोरिवलीतील बाजारातही ग्राहकांची झुंबड उडाली होती. सामान्य, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत अशा सर्व स्तरांतील नागरिक दिवाळीच्या खरेदीकरिता बाहेर पडल्याने मोठी गर्दी पाहायला मिळाली. फेरीवाल्यांपासून छोट्या-मोठ्या दुकानांबरोबरच मॉलमध्येही गर्दी झाली होती. कोरोना महामारीत आर्थिक नुकसान सहन केलेल्या व्यापाऱ्यांनी खरेदीला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे समाधान व्यक्त केले. कपडे, बांगड्या, सौंदर्य प्रसाधने, बूट, चप्पल, सोने-चांदीचे दागिने, वॉशिंग मशीन, फ्रिज, टीव्ही इत्यादींसारख्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसला. बाजारात ग्राहकांची रेलचेल वाढली आहे. सर्वच वर्गांतील ग्राहकांचा कल वस्तू खरेदीकडे असल्याने चांगला व्यवसाय होत आहे, असे व्यावसायिक स्वप्नील डुंबरे यांनी सांगितले. दोन वर्षांनी काही पैसे हातात पडल्याने मनमुराद खरेदी करत आहोत. बाजारातही अनेक पर्याय उपलब्ध असल्याने यंदाचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे, असे ग्राहक मंगला बाबू यांनी सांगितले.