
प्रलंबित अनुदान देण्याची महाराष्ट्र चेंबरची मागणी
मुंबई, ता. १८ ः महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील उद्योगांचे गेल्या दोन वर्षांपासूनचे प्रलंबित अनुदान राज्य सरकारने तात्काळ द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजने केली होती. याला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनुदान वितरित करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे सामंत यांनी सांगितले.
चेंबरच्या शिष्टमंडळाने उद्योगधंद्याच्या प्रलंबित अनुदानासंबंधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामंत यांची भेट घेतली. त्या वेळी चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी ही मागणी केली. राज्यातील उद्योग प्रकल्पांचे प्रलंबित अनुदान सुमारे नऊ हजार कोटी इतके आहे. त्यापैकी सरकारने तीन हजार कोटी रुपये अनुदान मंजूर केले असून ६७० कोटी रुपये प्रत्यक्ष वितरित केले आहेत. मंजूर रकमेपैकी उरलेले २३०० कोटी रुपये एकरकमी द्यावेत अशी मागणीही त्यांनी केली. नवीन व विस्तारित उद्योग प्रकल्पांच्या अनुदान पात्रतेसाठीची मर्यादा आणखी दोन वर्षे वाढवावी. कोरोना काळातील फुकट गेलेल्या दोन वर्षांच्या काळाऐवजी ही मुदतवाढ द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
हे अनुदान लवकर वितरित व्हावे अशी सरकारची भूमिका असून तात्काळ हे अनुदान वितरित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मंजूर रक्कम एक अथवा दोन टप्प्यांत ताबडतोब वितरित करण्याचे आदेश दिले जातील असे सामंत यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतींमधील विविध प्रलंबित प्रश्न तसेच उद्योग जगताच्या अन्य मागण्यांबाबत लवकरच चेंबरच्या पदाधिकाऱ्यांशी संयुक्त बैठक घेऊ असे आश्वासन सामंत यांनी दिले.