शिक्षक संघटनांचे आंदोलन तीव्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक संघटनांचे आंदोलन तीव्र
शिक्षक संघटनांचे आंदोलन तीव्र

शिक्षक संघटनांचे आंदोलन तीव्र

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांच्या वेतन अनुदानासाठी होत असलेल्या दिरंगाईविरोधात आझाद मैदानात आठ दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. या आंदोलनाला आता इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे. प्रथमच अनेक संस्थाचालक आंदोलनात सहभागी झाल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
आझाद मैदानात मागील आठ दिवसांपासून शिक्षकांनी आंदोलन सुरू केले आहे. यासाठी शिक्षक समन्वय संघ, विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयातील वेतन अनुदान तातडीने देण्याची प्रमुख मागणी केली जात आहे. राज्यातील ‘कायम’ शब्द काढलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वर्ग तुकड्यावर सुमारे ६५ हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यातील काहींना २० टक्के; तर काहींना ४० टक्के अनुदान; तर काहींना नव्याने अनुदान सुरू करण्यासाठीची सर्व कार्यवाही होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने या शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
--
दिवाळीही आझाद मैदानातच
ज्या शासन निर्णयाने राज्यातील शाळांचे मूल्यांकन केले, त्याच शासन निर्णयातील वेतन अनुदान वितरणाचे सूत्र लागू करून १०० टक्के अनुदान देऊन शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, अशी मागणी आंदोलक शिक्षकांकडून केली जात आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही. प्रसंगी दिवाळीही येथेच साजरी करण्यात येईल, असा इशाराही संघटनेकडून देण्यात आला.
---
१ नोव्हेंबर रोजी बैठक
शिक्षक संघटनांच्या आंदोलनाबाबत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी १ नोव्हेंबर रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार गाणार यांनी दिली. त्यासाठी आपण आज अर्थमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठवले होते, असेही त्यांनी सांगितले.