युगांडा आणि आयएमसी चेंबरमध्ये करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युगांडा आणि आयएमसी चेंबरमध्ये करार
युगांडा आणि आयएमसी चेंबरमध्ये करार

युगांडा आणि आयएमसी चेंबरमध्ये करार

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : युगांडाचे वित्त आणि नियोजन मंत्री मतिया कसैजा यांच्याबरोबर आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने दोन्ही देशांतील व्यापार, उद्योग वाढण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या मतिया यांनी नुकतीच आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी दोन्ही देशांमधील व्यापार, उद्योग वाढण्याबाबत चर्चा करण्यात आली. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष समीर सोमय्या यांनी या करारावर स्वाक्षरी केली.

दोन्ही देशातील व्यापार वाढवण्यासाठी युगांडाच्या सरकारबरोबर एकत्रितपणे काम करण्याची तयारीही सोमय्या यांनी या वेळी दाखवली. पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये खाणकाम, कच्चे तेल उत्खनन, तांबे, सोने उत्खनन आदी क्षेत्रांमध्ये संधी आहे. या क्षेत्रात भारतीय उद्योजक युगांडामध्ये व्यापार करू शकतील. युगांडामध्ये खुली अर्थव्यवस्था असून व्यापार उद्योगासाठी अत्यंत नाममात्र दरात जमीन मिळेल, तसेच गुंतवणूकदारांना अनेक सवलती मिळतील, असेही ते म्हणाले. भारतीय उद्योजकांचे स्वागत केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुढील महिन्यात युगांडामध्ये होणाऱ्या इंडियन इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रणही मंत्री मतिया यांनी आयएमसीला दिले. आयएमसी इंटरनॅशनल बिझनेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश जोशी यांनी आयएमसीच्या आंतरराष्ट्रीय व्यापार कार्यपद्धतीची माहिती दिली. तसेच एप्रिलमध्ये होणाऱ्या इंडिया कॉलिंग कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्याचे आमंत्रणही जोशी यांनी मतिया यांना दिले. दोन्ही देशांतील उच्चस्तरीय शिष्टमंडळाच्या अशा सतत भेटीमुळेच दोन्ही देशांतील व्यापारी संबंध दृढ होतील, असेही ते म्हणाले. आयएमसीच्या इंटरनॅशनल बिझनेस कमिटीचे सदस्य नेहल देसाई यांनी आभार मानले.