lumpy skin disease : लम्पीबाधित ७ हजार पशुधनाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpy skin disease Death of 7 thousand cattle
लम्पीबाधित सात हजार पशुधनाचा मृत्यू

lumpy skin disease : लम्पीबाधित ७ हजार पशुधनाचा मृत्यू

मुंबई : राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत दोन हजार ८२० गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. राज्यात सात हजार ३९ जनावरांचा मृत्यू झाला. बाधित गावांतील एकूण एक लाख १८ हजार ३१३ बाधित पशुधनापैकी ७५,११८ जनावरे उपचाराद्वारे रोगमुक्त झाली असल्याचे सांगण्यात आले.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये १४०.९७ लाख लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामधून १३३.१२ लाख पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. जळगाव, नगर, धुळे, अकोला, औरंगाबाद, बीड, कोल्हापूर, सांगली, वाशीम, जालना, हिंगोली आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधील लसीकरण पूर्ण झाले आहे. खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालक यांच्या आकडेवारीनुसार राज्यात सुमारे ९५.१४ टक्के गोवंशीय पशुधनाचे लसीकरण झाले आहे.

गंभीर प्रकरणांमध्ये घट
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांत लम्पी आजाराच्या नवीन व गंभीर प्रकरणांमध्ये घट झाल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. गेल्या आठवडाभरातील पाऊस व त्यामुळे निर्माण झालेल्या पावसाळी वातावरणामुळे कीटकांची वाढ, लम्पीच्या प्रादुर्भावासाठी अनुकूल ठरत होती. पावसाळी वातावरण व खालावलेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे दैनंदिन बाधित जनावरांची संख्या व मृत्यूमध्ये वाढ झाली होती.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विद्यापीठाने ७ ऑक्टोबर रोजी कीटक नियंत्रणासाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून राज्यभरात गोठ्यातील कीटक नियंत्रण, निर्जंतुकीकरण या महत्त्वपूर्ण बाबी पशुपालक व ग्रामपंचायती यांनी मोहीम स्वरूपात राबवाव्यात. पशुवैद्यकांनी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने सुधारित उपचार शिफारशींनुसार करावेत.
- सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग