तृत्तीयपंथियांच्या रोजगारासाठी ‘बंबई नजरिया’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तृत्तीयपंथियांच्या रोजगारासाठी ‘बंबई नजरिया’
तृत्तीयपंथियांच्या रोजगारासाठी ‘बंबई नजरिया’

तृत्तीयपंथियांच्या रोजगारासाठी ‘बंबई नजरिया’

sakal_logo
By

प्रकाशपर्व
तृतीय पंथीयांच्या रोजगारासाठी ‘बंबई नजरिया’

सुनीता महामुणकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईसारख्या गर्दीने भरगच्च असलेल्या शहरात एक पाचशे चौ.फुटाचा कॅफे तृतीय पंथीयांबाबतचा समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचा अनोखा प्रयत्न करत आहे. वर्सोवा येथे सुरू झालेल्या ‘बंबई नजरिया’ या कॅफेमध्ये ट्रान्सजेंडर व्यक्तींना काम दिले जाते. ही या कॅफेची खासियत आहे. बंबई नजरियाची सुरुवात दिएगो मिरांडा आणि ग्लेनिस डीसा यांनी एकत्रित केली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये हा कॅफे सुरू झाला. ट्रान्सजेंडर समाजघटकांना रोजगार मिळावा, हा यामागील उद्देश आहे.

या कॅफेची संकल्पना कशी सुचली, याबद्दल दिएगो मिरांडा म्हणाले की, माझे वडील फ्रान्सिस मिरांडा हे नेहमीच तृतीय पंथीयांना मदत करत असत. मी लहानपणापासून त्यांच्या उदार आणि सेवाभावी स्वभावाला पाहत आलो आहे. तृतीय पंथीयांना मुख्य प्रवाहात आणावे, असे त्यांना वाटायचे. त्यातूनच ही संकल्पना पुढे आली आहे. बंबई नजरिया हे माझ्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न आहे. ते पुढे म्हणाले की, सेवा क्षेत्रात काम करण्याचा माझ्या वडिलांचा विचार होता. त्यासाठी सुरुवातीला त्यांनी बर्गर आणि इतर पदार्थांचा स्टॉल सुरू केला होता. या कॅफेत ज्यांना खरेच काम करायचे आहे, त्यांचा विचार केला जातो. हमसफर ट्रस्ट आणि ट्विट फाऊंडेशनचे मोलाचे सहकार्य या कामासाठी मिळाले, असे दिएगो यांनी सांगितले.

येथील पिंक चाय, मून चाय फेमस आहे; तर मराठी पदार्थांनादेखील विशेष मागणी आहे. दिवाळीनंतर बंबई नजरिया नव्या ठिकाणी स्थलांतरित होत आहे. तृतीयपंथीयांच्या सर्वांपेक्षा वेगळे असण्यावर त्यांच्या घरच्यांना बऱ्याचदा आक्षेप नसतो. पण, लोकांचे ऐकून ते दबावाखाली येतात. त्यामुळे सर्वांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे दिएगो म्हणाले. हमसफर ट्रस्ट आणि ट्विट फाऊंडेशन अशा घर सोडलेल्या, नोकरी सुटलेल्या लोकांना मार्गदर्शन करतात. त्यांना आश्रय देतात, असेही त्यांनी सांगितले.
-------------------------
नावामागची संकल्पना
बंबई म्हणजे मुंबई आणि नजरिया म्हणजे दृष्टिकोन. एलजीबीटी समाजघटकांबाबत. समाजाची दृष्टी आणि मानसिकता बदलावी आणि त्यांना आपल्या मुख्य प्रवाहात सामील केले जावे, या हेतूने केलेला हा प्रयत्न आहे, असे दिएगो म्हणाले. बंबई नजरियाची ही हट के संकल्पना खरे तर एलजीबीटी समाजासाठी प्रकाश निर्माण करणारी आहे. अशा प्रकारे जर आणखी व्यावसायिक आस्थापनांनी तृतीय पंथीयांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या, तर नक्की समाजाचा नजरिया बदलायला सुरुवात होईल.