...तरीही मृत वडिलांच्या संपत्तीत हक्क कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तरीही मृत वडिलांच्या संपत्तीत हक्क कायम
...तरीही मृत वडिलांच्या संपत्तीत हक्क कायम

...तरीही मृत वडिलांच्या संपत्तीत हक्क कायम

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : दुसऱ्या पत्नीचा विवाह बेकायदा असला, तरी त्यांची मुलगी मृत वडिलांच्या संपत्तीच्या लाभास पात्र आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले आहे. हिंदू विवाह कायदा १९५५ च्या तरतुदीनुसार पहिली पत्नी हयात असताना दुसरा विवाह बेकायदा ठरतो. या प्रकरणात अर्जदार मुलीच्या पालकांचा विवाह बेकायद असला, तरीही तिच्या पित्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या संपत्तीचा हिस्सा मिळण्यास मुलगी पात्र ठरते, असे न्यायालयाने आदेशात नमूद करत एअर इंडियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या संपत्तीचे चार समान हिस्से करण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.

कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या आदेशाला मृत पित्याच्या पहिल्या पत्नीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दुसऱ्या पत्नीच्या मुलीनेदेखील त्याविरोधात हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता. पतीच्या मृत्यूदरम्यान कायदेशीररित्या आपण विवाहित पत्नी होतो, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या संपत्तीसाठी आपणच पात्र आहोत, असा युक्तिवाद पहिल्या पत्नीच्या वतीने करण्यात आला होता; मात्र, दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यावर न्यायालयाने अन्य कायदेशीर वारसदारांसोबत मृत वडिलांच्या संपत्तीचे चार समान हिश्श्यात विभाजन करून संपत्ती समान भागात वाटण्यात यावी, असे स्पष्ट केले.

दुसऱ्या पत्नीची मुलगीही संपत्तीच्या लाभास पात्र असून, तिलाही संपतीचा एक चतुर्थांश भाग द्यावा, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार, एअर इंडिया व्यवस्थापनाने चार वारशांपैकी प्रत्येकाच्या हिश्श्याची गणना करावी आणि कायद्यानुसार वडिल्यांच्या संपत्तीचे चार समान हिस्से करून ते चार महिन्यांमध्ये लाभार्थींना देण्याचे आदेशही दिले.