अखेर बेस्टच्या कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये बोनस जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

best bus
बेस्टच्या कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये बोनस

अखेर बेस्टच्या कंत्राटी कामगारांना ७,५०० रुपये बोनस जाहीर

sakal_logo
By

मुंबई: बेस्टच्या कंत्राटी कामगारांना छोट्या-मोठ्या गोष्टींसाठी वारंवार आंदोलन करावे लागत होते. दिवाळी बोनस मिळावा यासाठीदेखील कंत्राटी कामगारांनी आंदोलन सुरू केले होते. शेवटी मनसेच्या दणक्यानंतर कंत्राटदाराने कामगारांना बोनस देण्याचे मान्य केले.
मातेश्वरी ट्रान्स्पोर्ट कंपनीकडून बेस्टच्या ताफ्यातील बस चालवल्या जातात. १२०० पेक्षा अधिक कामगार आपली सेवा देत आहेत.

कामगारांना दिवाळीमध्ये बोनस मिळेल अशी अपेक्षा होती; मात्र कंपनी प्रशासन कामगारांच्या मागणीकडे कानाडोळा करत होते. यामुळे नाइलाजास्तव कामगारांनी सांताक्रूझ बस आगारात आंदोलन सुरू केले होते. कामगारांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाठिंबा देण्यात आला होता.

मनसेचे उपाध्यक्ष केतन नाईक यांनी सांताक्रूज आगारात जाऊन शनिवारी आंदोलनकर्ते कामगारांची भेट घेतली होती. त्यानंतर मातेश्वरी ट्रान्स्पोर्ट कंपनी प्रशासनाशी बैठक घेऊन चर्चा केली होती. दोन दिवसांत कामगारांच्या बोनसबाबत निर्णय नाही झाला, तर मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशाराही केतन नाईक यांनी दिला होता.

दोन दिवसांत रक्कम बँक खात्यात


कंत्राटदार कंपनीने आज कर्मचाऱ्यांना बोनस देत असल्याचे मनसेला लेखी कळवले. आपल्या पत्रात मातेश्वरी ट्रान्स्पोर्ट कंपनीने लिहिले आहे, की कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत आम्ही व्यवस्थापनाशी चर्चा केली. व्यवस्थापनानेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण वर्षभर काम केलेले आहे, अशा कर्मचाऱ्यांना रुपये ७,५०० इनके सानुग्रह अनुदान प्रदान करण्याचे निश्चित केले आहे. इतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या उपस्थितीनुसार सानुग्रह अनुदान प्रदान करण्याचे निश्चित केले आहे. सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली असून येत्या दोन दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल.