Leopard : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard
बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

Leopard : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : आईसोबत दिवाळीचे दिवे लावण्यासाठी घराबाहेर आलेल्या दीड वर्षीय चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आरे कॉलनी परिसरात आज घडली. इतिका लोट असे या चिमुकलीचे नाव असून, आरे कॉलनीतील युनिट क्र. १५ जवळ सकाळी सहाला ही घटना घडली.

बिबट्या युनिट क्र. १५ परिसरात भक्ष्याच्या शोधात आला होता. दिवे लावून झाल्यानंतर आई घरात गेली; मात्र इतिका तिच्या मागे घरात गेलीच नाही. त्याचवेळी घराबाहेर एकटी असलेल्या इतिकावर बिबट्याने मागून हल्ला केला. इतिका घरात आली नसल्याचे पाहून आईने तिची शोधाशोध सुरू केली असता, ती जंगल परिसरात जखमी अवस्थेत सापडली. तिला तात्काळ सेव्हन हिल रुग्णालयात नेण्यात आले; मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे उद्यान परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनास्थळी सुमारे १२ कॅमेरा सापळे बसवले असून बिबट्यांचे निरीक्षण केले जात आहे. दिवाळी असल्याने अनेक मुले फटाके फोडण्यासाठी बाहेर पडतील. त्यामुळे उद्यानातील कर्मचारी रात्री आणि पहाटे लहान मुलांना बाहेर न पाठवण्याची खबरदारी घेत ​​आहेत. ठाणे प्रादेशिक आणि उद्यान अशा दोन्ही विभागांच्या कर्मचाऱ्यांची परिसरात गस्त वाढवण्यात आली असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागाचे मुख्य वन संरक्षक, संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.