चार वर्षांपासून दिवाळी संक्रमण शिबिरातच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार वर्षांपासून दिवाळी संक्रमण शिबिरातच
चार वर्षांपासून दिवाळी संक्रमण शिबिरातच

चार वर्षांपासून दिवाळी संक्रमण शिबिरातच

sakal_logo
By

मुंबई, ता. २५ : लोअर परेल येथील ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी संक्रमण शिबिरात गेलेल्या पहिल्या टप्प्यातील नागरिकांना चौथी दिवाळी चिंतेत साजरी करावी लागत आहे. सात वर्षांत प्रकल्प मार्गी लागणार होता; मात्र इमारती रिकामी करण्यासाठीच पाच वर्षे लागल्याने पुनर्विकास कधी होणार, असा सवाल रहिवाशांकडून विचारला जात आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारने म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून निवड केली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून म्हाडाने नायगाव येथील बीबीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम एल अँड टी कंपनीला दिले आहे. ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या कामासाठी शहापूरजी अँड पालनजी आणि वरळी बीबीडीचे काम टाटा कंपनीला दिले आहे. वरळी येथे पुनर्विकास प्रकल्पाला प्रारंभ झाला आहे; मात्र नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील चाळी रिकाम्या करण्याचे काम अद्याप सुरू आहे. नेत्यांच्या आवाहनानुसार रहिवाशांनी २०१९ पासून ना.म. जोशी मार्गावरील घरे रिकामी करण्यास सुरुवात केली.
पुनर्विकास प्रकल्पाचे काम २०१७ पासून सुरू झाल्याने ते सात वर्षात मार्गी लावण्यात येणार होते; मात्र कोरोना आणि घरे रिकामी करण्यामध्ये पाच वर्षांचा काळ गेला आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात २०१९ मध्ये घरे रिकामी करणाऱ्या तब्बल २७२ कुटुंबांची सलग चौथी दिवाळी संक्रमण शिबिरात साजरी करावी लागली आहे. यानंतरही येथे पुनर्विकासाचे काम सुरू होत नसल्याने आता रहिवासी चिंतेत आहेत.
---
आणखी किती वर्षे प्रतीक्षा
ना. म. जोशी मार्ग येथे ३२ इमारती असून प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात १० इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे; मात्र आतापर्यंत एक इमारत जमीनदोस्त करण्यात आली, तर दोन इमारती रिकाम्या केल्या आहेत. चार इमारतींमध्ये अद्यापही काही नागरिक राहत आहेत. प्रकल्पाचे काम सुरु होत नसल्याने आणखी किती वर्षे संक्रमण शिबिरात राहणार, असा सवाल ना. म. जोशी मार्ग पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केला आहे.