पोलिसाचा गळा धरणाऱ्याला सहा महिन्यांचा कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसाचा गळा धरणाऱ्याला
सहा महिन्यांचा कारावास
पोलिसाचा गळा धरणाऱ्याला सहा महिन्यांचा कारावास

पोलिसाचा गळा धरणाऱ्याला सहा महिन्यांचा कारावास

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : ‘नो एण्ट्री’मधून जाण्यासाठी मज्जाव करणाऱ्या वाहतूक पोलिसाचा गळा धरणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना मुंबई सत्र न्ययालयाने सहा महिने कारावासाची सजा सुनावली आहे. सहा वर्षांपूर्वी जुलैमध्ये वरळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. आरोपी मोहम्मद शाकिर अन्सारी आणि अस्लम मेंहदी हसन शेख यांच्याविरोधात पोलिस प्रवीण कदम यांनी गुन्हा दाखल केला होता.
आरोपी ‘नो एण्ट्री’ मार्गावर गाडी चालवत होते. कदम यांनी त्यांना थांबवत पुढे जाण्यासाठी मज्जाव केला आणि परत मागे जायला सांगितले. त्यातून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. वादावादीवरून आरोपींनी पोलिसाला मारहाण केली आणि त्यांचा गळा धरला. त्यामध्ये कदम यांना गंभीर दुखापत झाली आणि ते खाली कोसळले. आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. या वेळी कर्तव्यावर असलेल्या दोन महिला पोलिसांनी त्यांना मदत केली आणि नियंत्रण कक्षाला कळवत मदत मागवली.
आरोपींवर भादंवि ३५३, ३३२ नुसार सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे, तणाव निर्माण करणे, धमकावणे आदी आरोप करण्यात आले होते. आरोपींनी या आरोपांचे खंडन केले; मात्र न्या. एस. डी. तवशीकर यांनी हा युक्तिवाद अमान्य केला. अन्सारी गाडी चालवत होता आणि ‘नो एण्ट्री’मध्ये जाण्यासाठी विनवणी करत होता; मात्र कदम यांनी त्यास परवानगी दिली नाही. पोलिस कर्मचाऱ्यांवर हात उगारणे अक्षम्य आहे. यासाठी आरोपींना शासन व्हायला हवे असे त्यांनी म्हटले.
---
...म्हणून सहा महिन्यांची शिक्षा
केंद्र सरकारने सन २०१८ मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यास शिक्षेत वाढ केली आहे. यानुसार या प्रकरणांमध्ये दोन ते पाच वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते; मात्र हा गुन्हा २०१६ मध्ये घडल्याने न्यायालयाने ही शिक्षा लागू न करता सहा महिन्यांची शिक्षा सुनावली.