उल्हास नदीला अवैध वाहनांचा विळखा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हास नदीला अवैध वाहनांचा विळखा
उल्हास नदीला अवैध वाहनांचा विळखा

उल्हास नदीला अवैध वाहनांचा विळखा

sakal_logo
By

मुंबई, ता. २७ : उल्हास नदीला अवैध वाहनांचा गराडा पडला आहे. मोठमोठी वाहने नदीत उतरवून धुतली जात असल्याने नदीचे प्रदूषण वाढले आहे. वनशक्ती संस्थेने दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याबाबत तक्रार करूनही यावर काहीही कारवाई झालेली नाही, असे सांगत पर्यावरणवादी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उल्हासनगर महापालिका, तसेच कुळगाव-बदलापूर नगर परिषद क्षेत्रातून वाहणारी उल्हास नदी गोड आणि शुद्ध पाण्याच्या प्रवाहासाठी ओळखली जाते. मात्र या नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा वाहने धुतली जात आहेत. यामुळे नदीचे पाणी अस्वच्छ होत असून प्रदूषणही वाढत आहे. वनशक्ती संस्थेचे प्रमुख स्टॅलिन डी. यांनी दोन वर्षांपूर्वी याविरोधात आवाज उठवला होता. मात्र त्याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही, असे स्टॅलिन डी. यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार वाढला आहे. तक्रार केल्यानंतर इतकी वर्षे उलटूनही काहीही फरक पडलेला नाही. हे कमी होते की काय, म्हणून ट्रक, टेम्पो, बाईक, रिक्षा इत्यादी वाहने नदीपर्यंत जाऊ देण्यासाठी कुळगाव-बदलापूर महापालिकेवर चक्क रॅम्प बांधला आहे. हेंद्रेपाडा नाल्याचा मुख्य प्रवाहही नदीत सोडण्यात आला आहे. उल्हास नदीच्या पिण्याच्या पाण्यात विनापरवाना सांडपाणी सोडण्याचा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या मनाई आदेशानंतरही सुरूच आहे. या कृत्यांमधून पालिका प्रशासनाची उदासीन वृत्ती दिसून येते, अशी टीका स्टॅलिन यांनी केली आहे.
...
अधिकाऱ्यांचा समस्येकडे कानाडोळा
वनशक्ती संस्थेने याबाबत महापालिका, पर्यावरण सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे कागदोपत्री तक्रारी दाखल केल्या आहेत. यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही. मात्र या सर्व यंत्रणा याकडे कानाडोळा करत असल्याचे स्टॅलिन म्हणाले. तक्रारी आल्यानंतर कोणतेही प्राधिकरण यावर फौजदारी कारवाई करू शकते, मात्र अधिकारी वर्ग या समस्येकडे कानाडोळा करत असून काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोपही स्टॅलिन यांनी केला आहे.
-----
शहरातून निघणाऱ्या मुख्य नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी नदीत सोडले जात आहे. इतर ठिकाणी अवैध वाहने धुतली जात असतील तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तात्काळ पाहणी केली जाईल. असा प्रकार आढळल्यास ते रोखण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल.
- अजीज शेख, आयुक्त, उल्हासनगर मनपा
....