वांद्रे स्कायवॉक होणार अधिक मजबूत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांद्रे स्कायवॉक होणार अधिक मजबूत
वांद्रे स्कायवॉक होणार अधिक मजबूत

वांद्रे स्कायवॉक होणार अधिक मजबूत

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : वांद्रे स्थानक ते दिवाणी न्यायालयापर्यंतचा मुंबईतील पहिला स्कायवॉक जमीनदोस्त करण्यात आला आहे. हा स्कायवॉक पुन्हा उभारण्यासाठी महापालिकेने तयारी केली असून स्कायवॉकच्या पिलरचे नव्याने डिझाईन तयार केले आहे. नवीन आराखड्याला मंजुरी मिळताच स्कायवॉकचे काम सुरू करण्यात येणार आहे. नवीन आराखड्यानुसार स्कायवॉक अधिक मजबूत होणार असून त्याचे आयुर्मान ४० ते ५० वर्षाचे असेल असे सांगण्यात आले.

मुंबईतील एमएमआरडीएने आपल्याकडील सर्व स्कायवॉकच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेकडे सुपूर्द केली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बीकेसीकडे जाणारा उड्डाणपुल उभारण्यासाठी एमएमआरडीएने स्कायवॉकचा भाग तोडला आहे. यामुळे कलानगरकडे जाणारा मार्ग बंद झाला. यापाठोपाठ सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या स्कायवॉकचा वांद्रे न्यायालयाकडे जाणारा भागही प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. तेव्हापासून या मार्गावरील प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करत स्थानकाकडे जावे लागत आहे.

वांद्रे ते न्यायालयातपर्यंचा स्कायवॉक व्हीजेटीआयने धोकादायक असल्याचा अहवाल दिला. यासाठी सुमारे १५ कोटी रुपये खर्च येणार असल्याने महापालिकेने स्कायवॉक तोडून नव्याने उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी १६ कोटी रुपये खर्च येणार असून यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. मात्र, हा स्कायवॉक अधिक मजबूत करण्यासाठी स्कायवॉकच्या पिलरमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पिलरचे नवीन डिझाईन तयार करण्यात आले असून याबाबतचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच वांद्रे स्थानक पूर्व ते न्यायालय दरम्यान स्कायवॉक उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यास सुमारे दीड वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.