मुंबईत वॉकेथॉनचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईत वॉकेथॉनचे आयोजन
मुंबईत वॉकेथॉनचे आयोजन

मुंबईत वॉकेथॉनचे आयोजन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २९ : इंडियन ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या १९९०-२०१९ च्या अभ्यासानुसार देशभरात सर्वाधिक मृत्यू हे मेंदूशी निगडित आजारांमुळे होत आहेत. पक्षाघाताच्या रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे आवश्यक असल्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जागतिक पक्षाघात दिनाच्या निमित्ताने २९ ऑक्टोबरला, शनिवारी सकाळी ग्लोबल रुग्णालयाच्या वतीने मरीन ड्राईव्हला एअर इंडिया ते एनसीपीएपर्यंत वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

या वॉकेथॉनमध्ये स्थानिक गट, रुग्णालयाचे कर्मचारी, पक्षाघातामधून बरे झालेले रुग्ण आणि रुग्णालयातील डॉ. पंकज अगरवाल, डॉ. नितीन डांगे, डॉ. शिरीष हस्तक हे तज्ज्ञ डॉक्टर असे सुमारे १०० जण सहभागी झाले होते. ग्लोबल मोटिवेशनल स्पीकर डॉ. पवन अगरवाल यांच्या हस्ते झेंडा दाखवून वॉकेथॉनची सरुवात करण्यात आली. न्यूरोलॉजी, स्ट्रोक आणि न्यूओक्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. शिरीष हस्तक म्हणाले की, पक्षाघाताच्या रुग्णामध्ये विशेषत: अक्युट इसेमिक स्ट्रोकच्या रुग्णांमध्ये आजाराचे निदान आणि उपचार वेळेत न मिळाल्यास अपंगत्व किंवा मृत्यूचा धोका असतो. पक्षाघात ही आपत्कालीन स्थिती असून यामध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्यामुळे रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळणे गरजेचे आहे. न्यूरोलॉजीचे वरिष्ठ डॉ. पंकज अगरवाल म्हणाले की, पक्षाघात हे मृत्यूचे आणि अपंगत्व येण्याचे प्रमुख कारण आहे. रुग्णाला वेळेत तातडीने उपचार मिळाल्यास मृत्यूसह संभाव्य अपंगत्वाचा धोकाही टाळणे शक्य असते.

डब्बावाला चॅलेंज
---------------
पक्षाघाताबाबत अधिक जागरूकता करण्यासाठी डब्बावाल्ला चॅलेंजचे आयोजन करण्यात आले होते. अर्धांगवायू, स्ट्रोकमुळे एखाद्या व्यक्तीने आपला हात गमावला, तर जीवन किती कठीण होऊ शकते, हे या माध्यमातून दाखवण्यात आले. हात गमावलेल्यांना डबा उघडण्यापासून इतर नियमित कामे करणे खूप अडचणीचे होऊ शकते. तेव्हा वेळेत उपचार घेतल्यास हे अपंगत्व टाळता येईल, हा संदेश जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहचवण्याचा यामागे उद्देश आहे.