प्राचार्य आणि शिक्षकांच्या कलाकृतींचा रंगोत्सव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राचार्य आणि शिक्षकांच्या कलाकृतींचा रंगोत्सव!
प्राचार्य आणि शिक्षकांच्या कलाकृतींचा रंगोत्सव!

प्राचार्य आणि शिक्षकांच्या कलाकृतींचा रंगोत्सव!

sakal_logo
By

मुंबई, ता. ३० : राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना विविध कला महाविद्यालयांतून चित्रकला, शिल्पकला आदींचे धडे देणारे कला शिक्षक आणि प्राचार्यांच्या कुंचल्यातून रेखाटण्यात आलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत १ नोव्हेंबरपासून भरणार आहेत. ७ नोव्हेंबरपर्यंत ते सुरू राहणार आहे. चित्र प्रदर्शनाचे उद्‍घाटन मुंबादेवी मंदिर संस्थानचे पदाधिकारी मिहीर मेहता यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्यकला संचालनालयालचे संचालक प्रा. विश्वनाथ साबळे उपस्थित राहणार आहेत.

जहाँगीर आर्ट गॅलरीतील ऑडिटोरियम हॉलमध्ये शिक्षकांनी साकारलेल्या चित्रांचे आणि शिल्पांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. विविध विषयांवरील कलाकृतींचा त्यात समावेश असून त्यांची माध्यम आणि शैली भिन्न आहे. प्रदर्शनामध्ये ड्रॉईंग, पेंटिंग आणि शिल्पाकृती मांडण्यात येणार आहे.
वैशाली पाटील कोल्हापूरमधील कलानिकेतन महाविद्यालयामध्ये अध्यापक असून समकालीन दृश्यकलेत त्यांच्या कलाकृतींची स्वतंत्र ओळख आहे. त्यांच्या चित्रांत भारतीय लोकसंस्कृतीतील स्त्रियांचे भावविश्व रेखाटलेले आहे. शिवाय शैव तत्त्वज्ञानातील शिव प्रतिमा आणि त्यांचे मानवाशी अन् निसर्गाशी असलेले नाते चित्रित केलेले आहे. सांगलीच्या कला विश्व महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पाटील ‘कलापुष्प’ कलाविषयक चळवळीचे प्रणेते आहेत. त्यांच्या चित्रांत निसर्ग डोकावत असतो. निसर्गाचा बकालपणा आणि विद्रूपीकरण त्यांनी चित्रांत रेखाटले आहे. राजेंद्र महाजन चोपडा येथील ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. ते ज्येष्ठ कलाध्यापक आणि कला अभ्यासक आहेत. मानवी भावविश्वाचे अनेक पदर त्यांच्या चित्रांत पाहावयास मिळतात. दुःख, दारिद्र्य आणि अगतिकता प्रत्ययास येते. विरूपीकरणात्मक शैलीत रेखाटलेली त्यांची चित्रे रसिकांना भावणारी आहेत. शिल्पकार आप्पासाहेब घाटगे जयसिंगपूरमधील प्रसिद्ध शिल्पकार आहेत. त्यांच्या शिल्पांची सर्जनशीलता आणि आशयघनता पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते.

वास्तवदर्शी आणि गूढ निसर्गचित्रे
हणमंत लोहार यांनी कोकणातील निसर्गाचे रूप रेखाटलेले आहे. निसर्गातील वैविध्याचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रांत उमटलेले दिसते. संजय क्षीरसागर मुंबईच्या कलावर्तुळात परिचित असणारे कलावंत आहेत. काहीशी वास्तवदर्शी आणि गूढ वाटावीत अशी त्यांची निसर्गचित्रे आहेत.