दिल्लीत हुशारीने काम करावे लागते; मंत्री नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadakari
दिल्लीत हुशारीने काम करावे लागते ः गडकरी

दिल्लीत हुशारीने काम करावे लागते; मंत्री नितीन गडकरी

मुंबई : मागील लोकसभा निवडणुकीत विरोध असतानाही मी निवडणूक लढवली आणि ३ लाख ५० हजारांहून अधिक मते मिळवली. पुढील निवडणुकीत मी ५ लाखांहून अधिक मते घेऊन निवडून येईन, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. आयआयटी मुंबई येथे आयोजित केलेल्या अलंकार ग्लोबल लीडर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दिल्लीत खूप हुशारीने काम करावे लागते, असेही गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, मी पुढील निवडणुकीत प्रचारासाठी फोटो आणि कटआऊट लावणार नाही. ही निवडणूक मी माझ्या हिशेबाने लढवेन. ज्यांना मत द्यायचे ते देतीलच. लोकांचा विश्वास खूप महत्त्वाचा असतो. मते देताना लोक जात, वर्ग आणि इतर सर्व सोडून आपल्याला मते देतात, असे गडकरी म्हणाले. पुढे गडकरी म्हणाले, दिल्लीतील पाणी चांगले नाही, पण महाराष्ट्र आणि मुंबई त्या मानाने खूप चांगली आहे. दिल्लीत खूप हुशारीने काम करावे लागते. ज्या लोकांना मी खूप मोठा समजत होतो, त्यांच्याजवळ गेल्यानंतर ते छोटे असल्याचे जाणवले, पण ज्यांना मी छोटा समजत होतो ते प्रत्यक्षात खूप मोठे असल्याचे जाणवले, असेही गडकरी यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले, शिक्षण आणि पदवीमुळे आपण फक्त शिक्षित होतो, सुसंस्कृत होत नाही. त्यामुळे शिक्षणासोबत संस्कार खूप महत्त्वाचे असतात. मूल्याधिष्ठीत संस्कार, जीवनपद्धती हा नितीचा भाग आहे. ही भारतीय समाजाची मोठी ताकद आहे. मूल्याधिष्ठीत संस्कार आणी जीवनपद्धत यांचा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्याशी समन्वय होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

ई-ट्रक लॉन्च करणार
देशाच्या विकासामध्ये वाहतूक व्यवस्थेचे खूप मोठे महत्त्व आहे. त्यामुळे ही व्यवस्था विकसित झाली तरच देश विकसित होऊ शकेल. त्यामुळे आपण देशात हायवे बनवण्याचा प्लॅन करत असून त्यासाठी आयआयटीतील विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, त्यासाठीचा पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्ही देऊ, असे गडकरी म्हणाले. तसेच पुढच्या महिन्यात ई-ट्रक लॉन्च करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.