दिवाळीनंतर तरी अरे कॉलनीतल्या त्या विद्यार्थ्यांचा शाळोतील प्रवास सुखकर होईल का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीनंतर तरी अरे कॉलनीतल्या त्या विद्यार्थ्यांचा शाळोतील प्रवास सुखकर होईल का
दिवाळीनंतर तरी अरे कॉलनीतल्या त्या विद्यार्थ्यांचा शाळोतील प्रवास सुखकर होईल का

दिवाळीनंतर तरी अरे कॉलनीतल्या त्या विद्यार्थ्यांचा शाळोतील प्रवास सुखकर होईल का

sakal_logo
By

शिक्षणासाठी जंगलातून पायपीट!
आरे कॉलनीतील शाळेतील विद्यार्थ्यांना अपुऱ्या बससेवेचा फटका

मुंबई, ता. ३० : शिक्षण हक्क अधिकार कायद्यानुसार विद्यार्थ्यांना विनाअडथळा प्रवासाची सोय उपलब्ध होणे बंधनकार आहे. मुंबईतील आरे कॉलनीतील युनिट क्रमांक १६ क्रमांकाच्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मात्र आजही अपुऱ्या बस व्यवस्थेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आरेच्या जंगलातून जीव धोक्यात घालत पायपीट करून त्यांना शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर तरी आपला प्रवास सुखाचा होईल काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

गोरेगावच्या आरे कॉलनीतील १६ क्रमांकाच्या शाळेत परिसरात असलेल्या २७ आदिवासी पाड्यांतील सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थी शिकतात. विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत किमान १२ ते १५ बसची गरज असताना केवळ पाच-सातच सुरू असतात. परिणामी असंख्य विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून शाळा गाठावी लागते. त्यामुळे दिवाळी सुट्टीनंतर ९ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू झाल्यानंतर तरी जास्तीच्या बस मिळून प्रवास सुखकर होईल काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. विद्यार्थ्यांच्या बस प्रवासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. २०१४ मध्ये तर खूपच वाईट परिस्थिती होती. आता त्यात काही सुधारणा झाली आहे. बस वाढल्यास विद्यार्थ्यांची गैरसोय कमी होईल, असे फुले-शाहू-आंबेडकरी पालक-विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण यादव यांनी सांगितले.

आरे कॉलनीतील २७ आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांसाठी युनिट क्रमांक १६ शाळा अत्यंत महत्त्वाची आहे. गोरेगाव परिसरातील विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात शाळेत येत असतात; परंतु त्या ठिकाणी बेस्ट प्रशासनाच्या पाच ते सात बसच असल्याने अनेक विद्यार्थ्यांचा प्रवास अडचणीचा होत आहे. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून आरेच्या जंगलातून चालत शाळा गाठावी लागत आहे. वाढत्या धोक्यामुळे अनेक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणे बंद केले असल्याचे स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.

दिवाळी सुट्टी संपल्यानंतर महापालिकेच्या शाळा ९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांना नेहमीच्या मार्गावर असलेल्या बसमधून मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून दिली जाते; मात्र नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळ्या ठिकाणी विद्यार्थिसंख्या असल्यास तिथे बेस्ट प्रशासनाची बस उपलब्ध करून दिली जाते. एखाद्या ठिकाणी मागणी असल्यास अथवा बस कमी पडत असल्याचा प्रस्ताव आल्यास तातडीने बसची व्यवस्था केली जाईल.
- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी, मुंबई महापालिका

आरे कॉलनीतील शाळेत ये-जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. आरे कॉलनीतील रस्ते मुलांसाठी सुरक्षित नाहीत. आता दिवाळीनंतर शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन बससेवा सुरू केली जावी. संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याकडे गांभीर्याने पाहावे.
- राजेश पंड्या, उपाध्यक्ष, टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट