आणखी एक संशयित बिबट्या जेरबंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आणखी एक संशयित बिबट्या जेरबंद
आणखी एक संशयित बिबट्या जेरबंद

आणखी एक संशयित बिबट्या जेरबंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : आरे कॉलनी परिसरातील आणखी एका संशयित हल्लेखोर बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्याच्या सापळ्यात तो अडकला. सध्या या बिबट्याला वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून हल्ला करणारा बिबट्या तो हाच आहे का, हे ओळखण्यासाठी त्याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वन संरक्षक व संचालक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली.
आरे कॉलनी परिसरातील आदर्शनगरमधील हिमांशू यादव या पाच वर्षांच्या मुलावर ३ ऑक्टोबरला; तर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आरे युनिट क्रमांक १५ येथे इतिका लोटे नावाच्या दीड वर्षाच्या चिमुरडीवर २३ ऑक्टोबरला बिबट्याने हल्ला करून ठार मारले होते. या दोन घटनांमुळे आरे परिसरात बिबट्याची दहशत पसरली होती. लोकांचा आक्रोशही वाढला होता. हे हल्ले आरे परिसरामध्ये वावर असणाऱ्या सी ५५ आणि सी ५६ बिबट्यांपैकी एकाने केले असल्याचा संशय वन विभागाला आहे. त्यामुळे बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पिंजऱ्यांचा सापळा लावला होता. याशिवाय आरे युनिट क्रमांक १५ परिसरात कॅमेरा ट्रॅपही वाढवण्यात आले होते. याशिवाय बिबट्याच्या हालचालींवर विशेष अधिकाऱ्यांचे पथकही लक्ष ठेवून होते. रविवारी पहाटे आरे मिल्क कॉलनीतील युनिट १५ मध्ये लावलेल्या पिंजऱ्यात नर बिबट्या घुसला. या प्राण्याला उद्यानातील बिबट्या बचाव केंद्रात नेण्यात आले.
याआधी २६ ऑक्टोबरला सी ५५ हा पहिल्या संशयित बिबट्याला जेरबंद केल्यानंतर आज पहाटे ६ च्या दरम्यान दुसऱ्या संशयित बिबट्या सी ५६ ला पकडण्यात आले. दोन्ही संशयित बिबटे सध्या वन विभागाच्या ताब्यात आहेत.
...
केंद्रीय समितीच्या सल्ल्यानुसार...
जेरबंद केलेल्या दोन्ही बिबट्यांची जुनी माहिती, फोटो आणि सीसीटीव्ही चित्रण तपासून ओळख पटवली जाणार आहे. या दोन बिबट्यांपैकी हल्लेखोर बिबट्याची ओळख पटली तर वन विभागाच्या केंद्रीय समितीच्या सल्ल्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. मानव-बिबट्या संघर्षाच्या घटनेमागे हाच संशयित बिबट्या आहे का, याचा तपास सुरू असून त्याआधारे पुढील निर्णय घेतला जाईल. पुढेदेखील गस्तीसह कॅमेरा ट्रॅपिंगची व्यवस्था सुरू राहणार असल्याची माहितीही मल्लिकार्जुन यांनी दिली.
........